पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसकडून देशभरात ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा केला जात आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडूनही विजय दिवस साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्याचा जल्लोष दादरमधील टिळक भवन या कार्यालयात करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून विजय दिवस साजरा केला. यावेळी काँग्रेसचे नेते नसीम खान, चद्रकांत हांडोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारने आखलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. दरम्यान १९ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने हे तिनही कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अनेकांनी फटाके फोडत, पेढे वाटत आनंद व्यक्त केला आहे.