हसावे की रडावे.. जामीन मिळावा म्हणून चक्क न्यायाधीशांचा फोटो वापरून जादूटोणा! मासा, लिंबू, कुंकू घेऊन स्मशानात..

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना तेथे जादूटोण्यासाठी वापरण्यात आलेले अनेक साहित्य आढळले.
हसावे की रडावे.. जामीन मिळावा म्हणून चक्क न्यायाधीशांचा फोटो वापरून जादूटोणा! मासा, लिंबू, कुंकू घेऊन स्मशानात..

Bilaspur Black Magic High Court Judge Bail Case 2026: छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात अंधश्रद्धेचा एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार उघडकीस आला आहे. सिपत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवरी गावातील स्मशानभूमीत शुक्रवारी मध्यरात्री चार जण संशयास्पद हालचाली करत तांत्रिक पूजा करत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन विचारपूस केली असता, अंधाराचा फायदा घेऊन तिघे जण पसार झाले; मात्र ऋषिकेश कुमार नावाच्या एका तरुणाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मुख्य न्यायाधीशांसह पीडिताचा फोटो, मासा अन् लिंबू जप्त
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना तेथे जादूटोण्यासाठी वापरण्यात आलेले अनेक साहित्य आढळले. यामध्ये मासा, लिंबू, कुंकू आणि इतर पूजा साहित्यासह तीन विविध छायाचित्रे जप्त करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, या फोटोंमध्ये छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमेश सिन्हा, चाकू हल्ल्यातील आरोपी प्रियांशु बोले आणि खुद्द पीडित व्यक्तीचे छायाचित्र ठेवण्यात आले होते.

हेही वाचा – Jharkhand Students Protest: सरकारचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांच्या मागण्यांसमोर झारखंड सरकार नरमलं, आता 90 दिवसांत…

ऑनलाईन तांत्रिकाचा व्हिडिओ पाहून जामिनासाठी रचला कट
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ऋषिकेश कुमारची कसून चौकशी केली असता ही संपूर्ण कहाणी समोर आली. त्याचा नातेवाईक प्रियांशु बोले एका गंभीर चाकू हल्ला प्रकरणात तुरुंगात असून त्याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित होता. सोशल मीडियावरील एका तांत्रिकाचा व्हिडिओ पाहून स्मशानात असा विधी केल्यास न्यायालयातून जामीन मिळण्यास मदत होते असा दावा करण्यात आला होता. त्या आधारेच आरोपींनी हा अघोरी प्रकार करण्याचा कट रचला होता.

'विधी करून जामीन मिळत नाही'; पोलीस प्रशासनाचे आवाहन
बिलासपूरचे पोलीस अधीक्षक राजनेश सिंह यांनी अशा फसव्या आणि अघोरी अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन नागरिकांना केले आहे. न्यायालयात कायदेशीर प्रक्रियेद्वारेच निर्णय होतात, कोणत्याही तांत्रिक विधीने जामीन मिळू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी सिपत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून गेलेल्या इतर 3 सहकाऱ्यांचा आणि व्हिडिओ बनवणाऱ्या तांत्रिकाचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा – FSSAI Raid: खाद्यपदार्थांत उंदराची विष्ठा अन् बुरशी… FSSAI ची उत्तर प्रदेश अन् महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांवर कारवाई

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version