बेल्जियम: बेल्जियममध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान समोर आलेल्या एका अनपेक्षित शोधामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. पाइपलाइन बदलण्याच्या कामासाठी जमीन खोदली जात असताना एका तरुण कामगाराला जमिनीखाली सोन्याच्या वस्तू आढळल्या. सुरुवातीला हा प्रकार सामान्य नाणे सापडल्यासारखा वाटला; मात्र काही क्षणांतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातू लपवून ठेवल्याचे स्पष्ट झाले.
ही घटना ब्रसेल्सपासून काही अंतरावर असलेल्या सिंट-गिलिस-डेंडरमोंडे परिसरात घडली. जुन्या रस्त्याच्या परिसरात पायाभूत सुविधांशी संबंधित काम सुरू होते. या कामात 18 वर्षीय कोबे आपल्या सहकाऱ्यांसोबत सहभागी झाला होता. खोदकाम करताना त्याला मातीमध्ये काहीतरी चमकत असल्याचे दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिले असता सोन्याची नाणी आणि विटांसारख्या आकारातील सोन्याच्या वस्तू असल्याचे लक्षात आले.
जुन्या वास्तूशी संबंध?
मिळालेल्या माहितीनुसार, हा खजिना एका जुन्या भव्य वास्तूच्या परिसरात आढळला. या वास्तूचा इतिहास शंभर वर्षांहून अधिक जुना असून, पूर्वी येथे प्रसिद्ध बीअर उद्योगाशी संबंधित कामकाज होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सापडलेल्या सोन्याचा या जुन्या वास्तूच्या इतिहासाशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
सोन्याच्या वस्तूंवर काही क्रमांक आणि इतर खुणा असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हा खजिना नेमका कोणाचा होता आणि तो इतकी वर्षे जमिनीखाली का लपवण्यात आला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पोलिसांनी घेतला खजिना ताब्यात
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून सोन्याचा साठा सुरक्षित ताब्यात घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून खजिना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला आहे.
तपास यंत्रणा आता या सोन्याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करत आहे. हा साठा एखाद्या जुन्या कुटुंबाची संपत्ती होती की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास केला जात आहे.
दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू सापडल्यानंतरही कोबेने त्या स्वतःकडे न ठेवता अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असून, त्याला कायदेशीररित्या काही बक्षीस मिळणार का, याबाबतही उत्सुकता आहे.