Copyright Case: मणिरत्नम यांच्या 2023 मधील तमिळ चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन 2' मधील गाणे 'वीरा राजा वीरा' विवादास्पद ठरल्यानंतर संगीतकार ए.आर. रहमान यांना दिल्ली उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने बुधवारी एकल न्यायाधीशांचा आधीचा अंतरिम आदेश रद्द केला. न्यायमूर्ती सी. हरि शंकर आणि ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने रहमान यांच्या अपीलला मंजुरी देताना म्हटले की, आम्ही अपीलला परवानगी देतो आणि एकल न्यायाधीशांचा आदेश बाजूला ठेवतो.
खटल्याची सुरूवात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मश्री फैयाज वसिफुद्दीन डागर यांनी केली होती. त्यांनी असा दावा केला की 'वीरा राजा वीरा' हे गाणे त्यांच्या कुटुंबाने रचित ध्रुपद-शैलीतील ‘शिव स्तुती’ या पारंपरिक संगीतावर आधारित आहे. डागरांनी सांगितले की, जरी गाण्याचे बोल वेगळे असले तरी लय, ताल आणि संगीताचा नमुना पारंपारिक ‘शिव स्तुती’ शी जुळतो.
हेही वाचा – National Awards 2025 : मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' बाल कलाकारांना मिळाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
दुसरीकडे, ए.आर. रहमान यांनी आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले. त्यांनी सांगितले की ‘शिव स्तुती’ ही पारंपरिक ध्रुपद रचना असून ती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध आहे. तसेच, 'वीरा राजा वीरा' ही पूर्णपणे मौलिक रचना असून यात पाश्चात्य संगीत तंत्रे आणि 227 थरांचा वापर करण्यात आला आहे, जे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतापेक्षा वेगळे आहे.
पूर्वीच्या निर्णयानुसार रहमान आणि चित्रपट निर्मात्यांना 2 लाख दंड भरावा लागला होता आणि 2 कोटी जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. रहमानने या निर्णयाला आव्हान दिले आणि 6 मे रोजी खंडपीठाने अंतरिम आदेश स्थगित केला. न्यायालयाने दंडाची रक्कम स्थगित केली, मात्र 2 कोटी जमा करण्याचा आदेश कायम राहिला. न्यायालयाने स्पष्ट केले की ही फक्त तात्पुरती व्यवस्था आहे. यामुळे अपीलच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही.
दरम्यान, रहमानचे प्रतिनिधित्व साईकृष्ण राजगोपाल, स्नेहा जैन, विवेक अय्यगरी, अक्षत अग्रवाल, कुबेर महाजन, विष्णुवी राव आणि अरुणिमा नायर यांनी केले, तर डागरांचे प्रतिनिधित्व नील मेसन, अर्जुन हरकौली, विहान डांग, उज्ज्वल भार्गव आणि अबीर शांडिल्य यांनी केले. या निर्णयामुळे रहमानला तात्पुरता दिलासा मिळाला असून मूळ कॉपीराइट उल्लंघनाचा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. तथापी, पुढील सुनावणीमध्ये त्याची सखोल चौकशी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.