Anand Mahindra: कृत्रिम बुद्धिमत्ता झपाट्याने वाढत असताना अनेक उद्योगांमध्ये नोकऱ्या धोक्यात येतील, अशी चर्चा सातत्याने सुरू आहे. विशेषत: व्हाईट-कॉलर नोकऱ्यांवर याचा मोठा परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी पूर्णपणे वेगळाच मुद्दा पुढे आणला आहे. AI मुळे होणाऱ्या बदलांपेक्षा जास्त गंभीर संकट कामगारांच्या तुटवड्याचे असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
महिंद्रा यांनी एक्सवर एका पोस्टद्वारे समाजाचे लक्ष एका महत्त्वाच्या समस्येकडे वेधले. त्यांनी स्पष्ट केले की, "आपण AI मुळे नोकऱ्या जाण्याची भीती बाळगण्यात इतके गुंतलो आहोत की प्रत्यक्षात समोर येणाऱ्या मोठ्या आव्हानाकडे आपले दुर्लक्ष होत आहे आणि ते म्हणजे कुशल कामगारांची कमतरता."
कुशल काम म्हणजे काय, आणि त्यांचाच तुटवडा का?
महिंद्रा यांच्या मते, गेल्या अनेक दशकांपासून समाजात एक चुकीची समजूत निर्माण झाली आहे पदवी, ऑफिस आणि डेस्कवरची नोकरी म्हणजेच यश. हाताशी कौशल्य असलेल्या व्यवसायांकडे सर्रास कमीपणा दाखवला गेला. परिणामी व्यवसायिक कौशल्ये शिकण्याची इच्छा कमी होत गेली आणि अनेक तरुण या क्षेत्रापासून दूर राहू लागले.
त्यांचा मुद्दा असा की, प्रत्यक्ष कामावर आधारित नोकऱ्या उदा. तांत्रिक काम, मशीन ऑपरेशन, दुरुस्ती, कन्स्ट्रक्शन, फॅब्रिकेशन या जागा AI भरून काढू शकत नाही. कारण या कामांमध्ये निर्णय क्षमता, प्रत्यक्ष अनुभव आणि हातोंहात कौशल्य लागते. त्यामुळे अशा नोकऱ्यांची गरज भविष्यात आणखी वाढणार आहे.
जिम फार्ले आणि एलॉन मस्क यांचाही समान इशारा
फोर्ड मोटर कंपनीचे सीईओ जिम फार्ले यांनीदेखील याच चिंतेकडे लक्ष वेधले होते. AI मुळे व्हाईट-कॉलर नोकऱ्यांमध्ये बदल होऊ शकतो, परंतु प्रत्यक्षात उद्योगांना सर्वात मोठी चिंता आहे ती ‘स्किल्ड लेबर’ची.
टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनीदेखील अमेरिकेत शारीरिक मेहनतीची कामे करणाऱ्या, तसेच अशा कामांसाठी प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांची संख्या धोकादायकरीत्या कमी होत चालल्याचे सांगितले. त्यांच्या मते, येणाऱ्या काळात तांत्रिक कौशल्य असणाऱ्यांची किंमत अधिक वाढणार आहे.
एआय युगात विजेते कोण?
महिंद्रा यांनी प्रश्न उपस्थित केला समाज आज ज्या करिअरला ‘ड्रीम जॉब’ समजतो, ते उद्या तसंच राहील का? त्यांच्या मते, AI च्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यात कोडर किंवा कॉर्पोरेट ऑफिसर्स नव्हे, तर प्रत्यक्ष कौशल्य असलेले तज्ज्ञ इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, टेक्निशियन, मशीन ऑपरेटर्स, फिटर, प्लंबर हे खरे ‘विनर्स’ ठरतील.
शिक्षण क्षेत्रासाठीही धडा?
या चर्चेमुळे एक मोठा प्रश्न समोर येतो आपला शिक्षण आणि करिअर मार्गदर्शनाचा दृष्टिकोन बदलायला हवा का? केवळ पुस्तकावर आधारित करिअरपेक्षा ‘कौशल्यावर आधारित’ करिअर भविष्यात अधिक महत्त्वाचे ठरण्याची स्पष्ट शक्यता आहे.