Amarnath Yatra Accident: जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील कंगन परिसरात मंगळवारी, 28 जुलै रोजी सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. बाबा बर्फानींचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची बस तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावरून घसरली. ही भरधाव बस थेट रस्त्याखालील एका घरावर जाऊन कोसळल्याने 39 यात्रेकरू जखमी झाले आहेत.
घरामुळे टळला मोठा अनर्थ
या अपघातात बस ज्या घरावर पडली, त्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, या घरामुळेच बस खाली असलेल्या सिंध नदीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचली. जर बस थेट नदीत गेली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने अपघाताच्या वेळी घराच्या आत कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे स्थानिक रहिवाशांनाही कोणतीही इजा झाली नाही.
सुरक्षा दले आणि स्थानिकांची मदत कार्य
अपघातानंतर भारतीय सेना, CRPF, ITBP, जम्मू-काश्मीर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ संयुक्तपणे बचाव मोहीम राबवली. पलटी झालेल्या बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील बहुतांश भाविकांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातातील जखमी भाविक हे दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतला आढावा
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी गांदरबलचे उपायुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व जखमींवर सध्या SKIMS रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने अपघाताच्या कारणांची अधिकृत चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात चालकाचा वेगावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.