Tech sector layoffs Adidas and Oracle: जर्मन स्पोर्ट्सवेअर ब्रँड असणाऱ्या 'ॲडिडास' (Adidas) कंपनीने भारतातील आपल्या टेक सेंटरमधील तब्बल 50 टक्के कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला आहे. गुरुग्राम येथील 'ॲडिडास इंडिया टेक हब'मध्ये कार्यरत असणाऱ्या एकूण 700 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 300 ते 350 तंत्रज्ञान तज्ज्ञांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनीअर्स यांचा समावेश आहे. मंगळवार 15 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या टाउन हॉल बैठकीत कंपनीने अचानक या निर्णयाची घोषणा केली.
व्यवसायाची पुनर्रचना आणि ऑपरेटिंग मॉडेलमधील बदलाचे कारण
या नोकरकपातीबाबत स्पष्टीकरण देताना कंपनीने हा एक कठीण निर्णय असल्याचे मान्य केले आहे. वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक गरजा, तंत्रज्ञानातील नवनवीन आव्हाने आणि ऑपरेटिंग मॉडेल सुलभ करणे या मुख्य कारणांमुळे ही पुनर्रचना करण्यात आल्याचे ॲडिडासने निवेदनात नमूद केले. संस्थेतील प्रक्रिया अधिक गतिमान करणे, महत्त्वाच्या क्षमतांना बळकटी देणे आणि भविष्यातील दीर्घकालीन यशासाठी तंत्रज्ञान विभागाची पुनर्रचना करणे हा या कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रभावित कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत केले जाणार कार्यमुक्त
कंपनीने नोकरकपातीची ही प्रक्रिया दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये राबवण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांना 15 सप्टेंबर रोजीच्या टाउन हॉल बैठकीतच थेट एक्झिट लेटर्स देऊन तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट असलेले कर्मचारी येत्या 15 डिसेंबरपर्यंत कंपनीत कार्यरत राहतील. या कालावधीत ते आपली दैनंदिन कामे आणि जबाबदाऱ्या उर्वरित सहकाऱ्यांकडे सोपवतील. कामावरून काढण्यात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ते संक्रमण सहाय्य आणि आदर दिला जाईल, असे आश्वासन कंपनीने दिले आहे.
5 वर्षांच्या आतच टेक हबमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येवर गदा
जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्यासाठी आणि इंजिनीअरिंग क्षेत्रातील उत्तम टॅलेंटला संधी देण्यासाठी ॲडिडासने 2021 मध्ये भारतात हे टेक हब सुरू केले होते. मात्र, हे केंद्र सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांच्या आतच 700 पैकी 350 कर्मचाऱ्यांना अचानक बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या कारवाईमुळे भारतीय आयटी (IT) आणि डेटा सायन्स क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, टेक हबमधील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टेक क्षेत्रात नोकरकपातीचे न थांबणारे सत्र; ओरॅकलमध्येही (Oracle) नवीन टाळेबंदी
आयटी व तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या व्यापक नोकरकपातीच्या लाटेचाच हा एक भाग मानला जात आहे. खर्च कमी करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह (AI) नव्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक वाढवणे यासाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या मनुष्यबळ कमी करत आहेत. ॲडिडासच्या या निर्णयासोबतच दिग्गज टेक कंपनी ओरॅकलनेही (Oracle) आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. ओरॅकलमधील प्रभावित कर्मचाऱ्यांना 14 सप्टेंबर रोजीच त्यांच्या पदांमध्ये कपात होत असल्याची पूर्वकल्पना देण्यात आली आहे. ओरॅकलने आधी 13 टक्के आता पुन्हा 10 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. या नोकरी कपातीच्या मागे अप्रत्यक्षपणे एआय कारण असल्याचे दिसत आहे.
भारतीय आयटी तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण
एककीकडे तंत्रज्ञान कंपन्या नवीन तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या विस्ताराचा दावा करत असताना, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष काम करणाऱ्या इंजिनीअर्स आणि डेटा तज्ज्ञांच्या नोकऱ्या अचानक जात आहेत. ॲडिडासच्या गुरुग्राम हबमधील ही कारवाई जागतिक पातळीवरील बदलत्या आर्थिक आणि तांत्रिक समीकरणांचा थेट परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. अचानक झालेल्या या नोकरकपातीमुळे बाधित झालेल्या शेकडो भारतीय इंजिनीअर्सना आता नवीन रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.