Adhik Maas 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार दर 29 ते 33 महिन्यांनी म्हणजेच सुमारे ३ वर्षांनी येणारा पवित्र अधिक मास सध्या सुरू आहे. वर्ष 2026 चा हा अधिक मास ज्येष्ठ महिन्यात आल्यामुळे याला 'अधिक ज्येष्ठ मास' म्हटले जाते. तो आध्यात्मिक दृष्टीने अतिशय कल्याणकारी मानला गेला आहे. तसेच, याला ग्रामीण भागात 'धोंड्याचा महिना' असेही म्हटले जाते. याचे एक कारण असेही आहे की, या महिन्यात धोंडा आणून पुजला तरी त्याचा देव बनतो. प्राणप्रतिष्ठापनेची गरज नसते. यामुळे देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी नवीन मूर्ती किंवा फोटो आणण्याची इच्छा असल्यास या महिन्यात नक्की आणावी आणि पूजेस लावावी.
या महिन्याची सुरुवात 17 मे 2026 रोजी झाली असून, 15 जून 2026 रोजी त्याची सांगता होईल. या पवित्र 'पुरुषोत्तम मासा'तील पहिल्याच गुरुवारी म्हणजेच 21 मे 2026 रोजी 'गुरुपुष्यामृत' नावाचा अत्यंत दुर्मिळ आणि सुवर्ण योग जुळून आला आहे. या दिवशी मनोभावे उपासना केल्यास भक्तांना जीवनात अफाट यश, सुख-समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती मिळते, असा दृढ विश्वास आहे.
गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? जाणून घ्या शुभ मुहूर्त
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या गुरुवारी 'पुष्य नक्षत्र' येते, त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' नावाचा महायोग तयार होतो. हा योग सर्व प्रकारच्या शुभ आणि मांगलिक कार्यांसाठी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. पुष्य नक्षत्राचा शाब्दिक अर्थ 'पोषण करणारा, ऊर्जा आणि शक्ती देणारा' असा होतो, तर ऋग्वेदात याला 'तिष्य' म्हणजेच मंगलदायी तारा असे संबोधले गेले आहे. गुरुवार, 21 मे 2026 रोजी हा शुभ योग सकाळी 06 वाजून 05 मिनिटांपासून सुरू होणार असून उत्तररात्री 02 वाजून 49 मिनिटांपर्यंत म्हणजेच संपूर्ण दिवसभर असणार आहे. हा योग वारंवार येत नसल्याने या संपूर्ण कालावधीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवीन व्यवसायाची सुरुवात आणि सोन्याची खरेदी
यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाची पायाभरणी करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी नवीन व्यापाराचा आरंभ करणे, नवे काम हाती घेणे किंवा काही कारणास्तव बंद पडलेले काम पुन्हा सुरू केल्यास त्यात मोठे यश मिळते. याशिवाय, या योगावर सोने खरेदी करण्याची प्राचीन परंपरा आहे; या मुहूर्तावर खरेदी केलेल्या सोन्यामध्ये उत्तरोत्तर वृद्धी होते, अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र, सर्व कार्यांसाठी हा दिवस अत्यंत शुभ असला तरी, शास्त्रानुसार पुष्य नक्षत्र विवाहासाठी वर्ज्य मानले गेल्यामुळे या दिवशी लग्नकार्ये केली जात नाहीत.
हेही वाचा – Adhik Maas 2026: विष्णुसहस्रनाम की पुरुषसूक्त? अधिक मासात कोणती स्तोत्र ऐकल्याने मिळेल विष्णूंची अफाट कृपा
अधिक मासाच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन
गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी धनलक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी लक्ष्मी पूजनाचे मोठे महत्त्व आहे. या विशेष तिथीला माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे केलेले पूजन अत्यंत शुभ आणि वर्षभर आर्थिक लाभ देणारे ठरते. आपल्या जीवनातील दारिद्र्य दूर करण्यासाठी, घरामध्ये सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी आणि अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी या दिवशी कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी. हा योग विविध मंत्र-तंत्र, संकल्प, आध्यात्मिक साधना आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. तसेच, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (Investment) देखील हा काळ अतिशय फायदेशीर ठरतो.
सद्गुरू सेवा आणि आध्यात्मिक उन्नतीची सुवर्णसंधी
अधिक मासात केलेल्या कोणत्याही लहान पूजेचे किंवा उपासनेचे फल सामान्य दिवसांपेक्षा 'अनेक पटींनी अधिक' मिळते. त्यातच पहिल्याच गुरुवारी हा अमृत योग आल्यामुळे दत्तगुरू, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा आणि आपल्या सद्गुरूंची सेवा करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. या दिवशी गुरूंना प्रिय असणाऱ्या मंत्रांचा जप करणे, स्तोत्रांचे पठण करणे आणि नामस्मरण केल्याने गुरूंची कालातीत कृपा भक्तांवर राहते. या काळात केलेली एक छोटीशी सात्विक सेवा देखील थेट गुरूपर्यंत पोहोचते आणि त्याचे अनेक पटींनी मोठे आणि शुभ फल भक्ताला प्राप्त होते, असे जाणकार सांगतात.
अधिक मास गुरुपुष्यामृत योगात कशी करावी उपासना?
– गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी केल्यास ते घरी आणून देवघरात ठेवावे.
– गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या वेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये गुंतवणूक करू शकता.
– गुरुपुष्य योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकतो. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते. तसेच, नवीन घराचे बांधकामदेखील करू शकतो.
– गुरुपुष्यामृत योगात व्यवसाय, व्यापार यासंबंधीत महत्त्वाची कामे करता येऊ शकतात. अडकले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर काम करता येऊ शकते.
– पैशांशी संबंधित काही समस्या असतील, तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी.
– गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्त्रोताचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते, असे म्हटले जाते.
– तसेच 52 श्लोकी गुरूचरित्र, दत्त बावनी अशी दत्तगुरूंची स्तोत्रे म्हणावीत किंवा श्रवण करावीत.
– अक्कलकोट स्वामी समर्थांचा तारक मंत्र अवश्य म्हणावा, शक्य असेल तर 11 वेळा पारायण करावे.
– शक्य असेल त्या वेळी विष्णू सहस्रनाम, पुरुषसूक्त, व्यंकटेश स्तोत्र म्हणावे किंवा ऐकावे
– आपल्या कुलदेवतेची जी शक्य असेल, ती उपासना करावी.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही. )
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.