Marathi Adhik Maas 2026 : भारतीय पंचांगानुसार अधिक मास ही केवळ धार्मिक प्रथा नसून ती खगोलशास्त्रीय गणितावर आधारित एक खास संकल्पना आहे. दर 3 वर्षांनी एकदा येणारा हा महिना सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी येतो. यंदा रविवार, 17 मे 2026 पासून अधिक ज्येष्ठ महिन्याला प्रारंभ होत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी 2018 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक आला होता आणि आता 2026 नंतर तब्बल 11 वर्षांनी, म्हणजेच 2037 मध्ये पुन्हा ज्येष्ठ महिना अधिक म्हणून येणार आहे. या काळात केलेल्या विधींमुळे सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.
महत्त्वाच्या तारखा आणि कालावधी
यंदाच्या वर्षी हिंदू आणि मराठी पंचांगानुसार ज्येष्ठ महिना दोनदा येईल. यामध्ये पहिला महिना अधिक (वाढीव) असेल, तर दुसरा महिना निज (मूळ) असेल. तारखांचा तपशील जाणून घेऊ..
– अधिक ज्येष्ठ मास: 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत.
– निज ज्येष्ठ मास: 15 जून 2026 ते 14 जून 2026 पर्यंत.
भगवान विष्णूंच्या वास्तव्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. आध्यात्मिक प्रगती आणि पुण्यसंचयासाठी हा 30 दिवसांचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो.
अधिक मासातील धार्मिक नियम आणि जीवनशैली
या पवित्र महिन्यात मनाची शुद्धी आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी काही विशिष्ट नियमांचे पालन करणे फलदायी ठरते. या काळात अखंड दीप प्रज्वलन केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन लक्ष्मी स्थिर होते, असा समज आहे. आरोग्य आणि संयमाच्या दृष्टीने खालील विधी महत्त्वाचे आहेत:
– एकभुक्त व्रत: पूर्ण महिनाभर दिवसातून केवळ एकच वेळ भोजन करून व्रत करणे.
– मौन भोजन: जेवताना शांत राहून म्हणजे मौन पाळून भोजन केल्याने मानसिक एकाग्रता वाढते.
– पवित्र स्नान: शक्य असल्यास गंगास्नान किंवा नजीकच्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जन्मांतरातील पापांचे क्षालन होते.
हेही वाचा – Kailash Mansarovar Yatra 2026: कैलास मानसरोवर यात्रेसाठी नोंदणी सुरू; अर्ज करण्याची पद्धत आणि अटी जाणून घ्या
अनारसे दान (अपूपदान) आणि विधी
अधिक मासात अपूपदान म्हणजेच अनारसे दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे दान विष्णुरूपी जावयाला, ब्राह्मणाला किंवा गरजवंताला शास्त्रोक्त पद्धतीने दिले जाते. दानाचे स्वरूप खालीलप्रमाणे असावे:
– 33 अनारसे, तांबूल (विडा) आणि योग्य दक्षिणा.
– दान करताना "मम त्रयस्त्रिंशद्देवतात्मक-विष्णुरूप-सहस्त्रांशोः मम पापविनाशाय अपूपदानं गृह्यताम्" या मंत्राचा संकल्प करावा.
या विधीमुळे केवळ धन-संपत्तीच नाही, तर ऐश्वर्य आणि मरणोत्तर मोक्ष प्राप्ती होते, असे शास्त्रात नमूद केले आहे.
श्रीविष्णू उपासना: संकटांचा नाश
अधिक मास हा पूर्णतः भगवान विष्णूंना समर्पित असल्याने या काळात विष्णू सहस्रनाम पठण किंवा विष्णूंच्या मंत्रांचा जप करणे पितृकृपेसाठी उत्तम मानले जाते. या काळात तांबूल दान केल्याने सौभाग्य प्राप्त होते. 17 मे पासून सुरू होणाऱ्या या संधी का लाभ घेऊन नामस्मरण आणि दानाद्वारे आपले आयुष्य अधिक समृद्ध करण्याची ही उत्तम वेळ आहे. विष्णू चरणी लीन होऊन आपल्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी आणि पुण्यसंचय करण्यासाठी या पवित्र महिन्याचे महत्त्व अफाट आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.