मराठी सह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने आपल्या करिअरमधून ब्रेक घेत असल्याचे सांगितले. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. आपल्या अभिनय कौशल्याने तरुणांमध्ये त्याने एक क्रेझ निर्माण केली. त्यानंतर अभिनय ‘मन कस्तुरी रे’, ‘अशी ही आशिकी’, ‘Boyz 4’, ‘दशावतार’, ‘उत्तर’, ‘वडापाव’, ‘रंपाट’, ‘उत्तर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसला. परंतु नवीन ‘स्टार्ट अप’ सुरु करण्यासाठी, सध्या अभिनयातून ब्रेक घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
व्हिडीओत अभिनय बेर्डे म्हणतो की, “हाय मी अभिनय, आज व्हिडीओ बनवण्याचे कारण खूप वेगळे आणि महत्त्वाचे आहे. मी माझ्या करिअरपासून थोडा ब्रेक घ्यायचे ठरवले आहे, आणि तो ब्रेक यासाठी आहे की, मी स्वतःचा स्टार्टअप सुरू करणार आहे. त्यासाठी काही नवीन आयडिया हव्या आहेत. अजून आयडियाच्या टप्प्यात आहे मी. अजून आयडिया सुचलेली नाही आहे. त्यामुळे मला तुमची मदत लागेल. त्यामुळे तुमच्याकडे Out Of The Box काही क्रेझी आयडिया असतील तर, कमेंट्समध्ये मला नक्की कळवा.”
चाहत्यांनी या व्हिडिओवर त्याच्या या नवीन प्रवासासाठी कमेंट्सद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या. आता अभिनय बेर्डेची स्टार्ट अप आयडिया काय असेल? तो पुन्हा चित्रपटांमध्ये कधी झळकेल? अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.