Aamir Khan Gauri Spratt Wedding: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अर्थात अभिनेता आमिर खान याने अखेर आपल्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर स्वतः शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेला आमिर खान त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅट हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याने माध्यमांसमोर येत या वृत्ताला दुजोरा दिला असून येत्या 5 जुलै रोजी हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर आता वयाच्या 60 व्या वर्षी आमिर आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे.
मुलगा जुनैदची मजेशीर प्रतिक्रिया
‘प्रेम पेड्रो’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी आमिर खान त्याचा मोठा मुलगा जुनैद खान याच्यासोबत आला होता. तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांनी जेव्हा त्याला लग्नाबाबत प्रश्न विचारला, तेव्हा आमिरने काहीसं संकोचत 'हो, माझं लग्न 5 जुलैला आहे,' असं उत्तर दिलं. आमिर जेव्हा माध्यमांसमोर आपल्या लग्नाची घोषणा करत होता, तेव्हा मागे उभा असलेल्या त्याच्या लेकाला म्हणजेच जुनैदला आपलं हसू अजिबात आवरत नव्हतं. मुलाच्या चेहऱ्यावरील तो मजेशीर भाव सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भव्य दिव्य लग्न नाही; घरीच होणार छोटेखानी सोहळा
आपल्या लग्नाविषयी अधिक माहिती देताना आमिर खानने स्पष्ट केले की, हे कोणतेही भव्य बॉलिवूड लग्न असणार नाही. त्याने लग्नाच्या स्वरूपाबाबत स्पष्टच माहिती दिली.- हा विवाह सोहळा पूर्णपणे खाजगी आणि कौटुंबिक पद्धतीचा असेल, असे त्याने सांगितले. कोणत्याही मोठ्या हॉटेलऐवजी अगदी साध्या पद्धतीने घरीच हा कार्यक्रम पार पडेल. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि बालपणीचे काही मोजकेच मित्र उपस्थित राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना आमिर खानने आपल्या आगामी प्रवासासाठी चाहत्यांकडे प्रेम आणि आशीर्वाद मागितले आहेत. आम्ही दोघेही पुढील आयुष्यात आनंदी राहू, यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी असे आवाहन त्याने केले आहे.
दोन घटस्फोटांनंतर आमिरच्या आयुष्यात गौरीची एन्ट्री
आमिर खानचे हे वैवाहिक आयुष्यातील तिसरे पाऊल आहे. त्याचे पहिले लग्न रीना दत्ता यांच्याशी झाले होते, ज्यांच्यापासून त्याला जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुले आहेत; मात्र 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2005 मध्ये आमिरने किरण राव हिच्याशी दुसरे लग्न केले, त्यांना आझाद राव खान हा मुलगा आहे. किरण आणि आमिरने देखील 2021 मध्ये परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोन लग्न मोडल्यानंतर आता आमिर खान आणि गौरी स्प्रॅटसोबत नवीन आयुष्याची स्वप्नं पाहत आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.