Muzaffarnagar Scooter Fine: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका स्कूटर चालकावर तब्बल 20.74 लाखांचा दंड ठोठावल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनालाही स्पष्टीकरण द्यावे लागले. घटनेनुसार, 4 नोव्हेंबर रोजी नवी मंडी पोलीस स्टेशन परिसरातील गांधी कॉलनी चौकी येथे अनमोल सिंघल या युवकाला स्कूटर चालवताना हेल्मेट नसणे, ड्रायव्हिंग लायसन्स नसणे, आणि वाहनाची कागदपत्रे नसणे या कारणांवरून दंड ठोठावण्यात आला. मात्र, सिस्टममधील त्रुटीमुळे दंडाची रक्कम थेट 20,74,000 इतकी दाखवली गेली.
घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि रक्कम सुधारून ती 4,000 केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चालान तयार करताना मोटार वाहन कायद्याच्या कलम 207 अंतर्गत दंड नोंदवताना तांत्रिक चूक झाली. कलम क्रमांक ‘207’ चुकून दंडाच्या आकड्यांमध्ये समाविष्ट झाल्यामुळे रक्कम लाखोंमध्ये वाढली.
दरम्यान, एसपी ट्रॅफिक अतुल चौबे यांनी स्पष्ट केले की, ही तांत्रिक त्रुटी होती आणि प्रत्यक्षात स्कूटर चालकाला फक्त 2,000 ते 4,000 दंड होणे अपेक्षित होते. पोलिसांनी संबंधित सब-इन्स्पेक्टरला सूचना दिली असून, प्रणालीतील चुका दुरुस्त करण्यात आल्या आहेत.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून, सोशल मीडियावर "20 लाखांचा स्कूटर दंड" हा विषय ट्रेंड झाला आहे. प्रशासनाने मात्र स्पष्ट केले आहे की, हा फक्त सिस्टम एरर होता आणि कोणत्याही नागरिकावर असा दंड प्रत्यक्षात लावलेला नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.