नागपूर : विदर्भातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आगामी ‘नीट’ परीक्षेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. परीक्षा केंद्रांवर कूलर, शुद्ध पिण्याचे पाणी, प्राथमिक वैद्यकीय सुविधा आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे आदेश न्यायालयाच्यावतीने देण्यात आले आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांना न्यायालयाचे निर्देश दिले आहेत. यंदाची ‘नीट’ परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार असून विदर्भातील सुमारे 25 ते 30 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. वाढत्या तापमानामुळे परीक्षा केंद्रांवरील सुविधांचा प्रश्न गंभीर बनल्याने न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. उष्ण वातावरणात तीन तासांची परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाचे निरीक्षण आहे. तसेच केंद्रांवर पुरेसा गारवा, हवा खेळती राहण्याची व्यवस्था, थंड पिण्याचे पाणी आणि प्राथमिक उपचार सुविधा आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. पुढील सुनावणीत सर्व स्पर्धा परीक्षा केंद्रांवर अशा सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करण्याबाबत आदेश देण्याचे संकेत दिले आहेत.