Kitchen Gas Leakage Prevention : स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान असले, तरी तिथे चविष्ट जेवण बनवण्यासोबतच सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण रेग्युलेटर तपासणे किंवा गॅस बंद करणे या गोष्टी रोज करतो, परंतु शेगडीला जोडलेल्या एलपीजी (LPG) पाईपकडे आपले पूर्णपणे दुर्लक्ष होते. बाजारात आणि घरांमध्ये प्रामुख्याने नारंगी, हिरवा आणि पादर्शक अशा 3 रंगांचे गॅस पाईप पाहायला मिळतात. अनेकांना हा रंगाचा फरक केवळ एक फॅशन किंवा डिझाईन वाटते; परंतु हा रंग तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा सर्वात मोठा संकेत असतो. चुकीचा पाईप वापरल्याने गॅस लीक होऊन कधीही भीषण अपघात घडू शकतो.
पारदर्शक आणि हिरव्या रंगाचे पाईप वापरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण
अनेक घरांमध्ये स्वस्त मिळतो म्हणून पारदर्शक (ट्रान्सपरंट) किंवा हिरव्या रंगाचा पाईप वापरला जातो, जो सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. या दोन पाईप्सची सद्यस्थिती खालीलप्रमाणे असते:
– पारदर्शक पाईप : हा आरपार दिसणारा प्लास्टिकचा पाईप असतो. शेगडीच्या उष्णतेमुळे हा पाईप लवकर कडक होतो आणि त्याला बारीक तडे जातात. तसेच, उंदीर हा प्लास्टिकचा पाईप सहज कुरतडू शकतात, ज्यामुळे गॅस गळतीचा धोका सर्वाधिक असतो.
– हिरवा पाईप : हा साधारणपणे पाण्याच्या पाईपसारखा असतो. या पाईपमध्ये गॅसचा उच्च दाब (high pressure) सहन करण्याची क्षमता नसते. स्वयंपाकघरातील तेलकटपणामुळे हा पाईप हळूहळू सैल होतो आणि शेगडीच्या नॉबमधून अचानक निघू शकतो.
नारंगी रंगाचा पाईप का मानला जातो सर्वात 'बेस्ट' आणि सुरक्षित?
भारताच्या सुरक्षा मानकांनुसार प्रमाणित केलेला नारंगी (ऑरेंज) रंगाचा पाईप हा गॅस सिलेंडरसाठी सर्वात सुरक्षित मानला जातो. याला 'सुरक्षा एलपीजी होज' (Suraksha LPG Hose) असे म्हटले जाते. हा पाईप एका विशेष दर्जाच्या रबरापासून तयार केला जातो, ज्याच्या आत स्टीलच्या तारांचे अत्यंत मजबूत जाळे असते. या स्टीलच्या कवचामुळे उंदीर हा पाईप कुरतडू शकत नाहीत. तसेच, हा पाईप हवामानातील बदलांमुळे किंवा उष्णतेमुळे कडक होत नाही आणि आग लागण्याचा अथवा गॅस लीक होण्याचा धोका नसतो.
गॅस पाईप वापरताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी
गॅस सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केवळ चांगला पाईप आणणे पुरेसे नाही, तर त्याचा वापर करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे:
गॅस पाईप नेहमी थेट अधिकृत गॅस एजन्सीकडूनच खरेदी करावा आणि त्यावर ISI मार्क असल्याची खात्री करावी.
नारंगी रंगाच्या गॅस पाईपची अधिकृत मुदत 5 वर्षे असली, तरी सुरक्षिततेसाठी तो दर 2 ते 3 वर्षांनी आवर्जून बदलला पाहिजे.
अनेक महिला पाईप खराब होऊ नये म्हणून त्यावर कापड किंवा प्लास्टिक गुंडाळतात. असे केल्याने पाईपला गेलेले तडे किंवा झालेली झीज डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे पाईप नेहमी उघडा ठेवावा.
महिलांची सुरक्षा आणि स्वयंपाकघरातील सतर्कता
घरातील महिलांचा सर्वाधिक वेळ स्वयंपाकघरात जात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या पाईपशी थेट जोडलेला आहे. किरकोळ पैशांची बचत करण्यासाठी स्थानिक बाजारातून निकृष्ट दर्जाचे पाईप खरेदी करणे भविष्यात मोठ्या नुकसानीचे कारण ठरू शकते. नारंगी रंगाचा सुरक्षा पाईप 5 वर्षांपर्यंत सहज टिकत असल्यामुळे तो दीर्घकाळासाठी फायदेशीर आणि चिंतामुक्त करणारा ठरतो. त्यामुळे आजच तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस पाईप तपासा आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करू नका.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.