छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरजवळील खवड्या डोंगर सध्या एका हृदयद्रावक घटनेमुळे चर्चेत आला आहे. कुणाल चांदगुडे या तरुणासह त्याचे आई-वडील मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे यांचा या परिसरात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असतानाच खवड्या डोंगराबाबतची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेकांनी जीव गमावल्याचे सांगितले जात असून, आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
तिसगाव परिसरात धुळे-सोलापूर महामार्गालगत हा डोंगर आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या उत्खननामुळे या परिसराचे नैसर्गिक स्वरूप बदलले आहे. डोंगराचा मोठा भाग कापला गेल्याने येथे उंच आणि सरळ कडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी हा कडा तब्बल 246 फूट उंच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा परिसर अत्यंत धोकादायक बनला आहे.
विशेष म्हणजे एवढा धोका असूनही या ठिकाणी पुरेशा सुरक्षा उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. कड्याच्या परिसरात संरक्षक कठडे किंवा जाळ्या नसल्याने नागरिकांना थेट धोकादायक भागापर्यंत जाता येते. प्रवेश रोखण्यासाठी प्रभावी उपाय किंवा पुरेसे इशारा फलक नसल्याने दुर्घटनेची शक्यता कायम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
याआधीही घडल्या आहेत गंभीर घटना
खवड्या डोंगरावर जीव गमावण्याची घटना नवीन नसल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत 13 जणांचा येथे मृत्यू झाला आहे. याशिवाय एका खुनाची घटनाही या परिसराशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी एका व्यक्तीने आपल्या बहिणीला कड्यावरून ढकलल्याची घटनाही घडली होती.
मात्र, या घटना अधूनमधून घडत असल्याने खवड्या डोंगराकडे सातत्याने लक्ष गेले नाही. आता चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे या ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सुरक्षा वाढवण्याची मागणी
डोंगरावरील उंच कड्यामुळे येथे जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कड्याच्या आसपास संरक्षणात्मक जाळ्या, कठडे आणि स्पष्ट इशारा फलक लावण्याची मागणी होत आहे. तसेच धोकादायक भागात नागरिकांना प्रवेश करता येऊ नये यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
एका कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर तरी प्रशासनाने खवड्या डोंगराच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भविष्यात आणखी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी या परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.