Cheapest Electric Scooter India 2026 : नुकतेच 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात प्रति लीटर 3 रुपयांची वाढ झाल्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भविष्यातही इंधन आणखी महाग होण्याची शक्यता असल्याने दैनंदिन प्रवासासाठी आता इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर हा सध्या सर्वोत्तम आणि शहाणपणाचा पर्याय दिसत आहे. या स्कूटरमुळे प्रवासाचा खर्च कमालीचा कमी होतो, ज्यामुळे खिशाला मोठा दिलासा मिळतो.
बॅटरी सबस्क्रिप्शन (BaaS) मॉडेल आणि इंधनाची बचत
अनेक वाहन कंपन्या आता ग्राहकांसाठी BaaS (Battery as a Service) हा नवा पर्याय बाजारात आणत आहेत. या सुविधेमुळे ग्राहकांना सुरुवातीला स्कूटर खरेदी करताना बॅटरीची मोठी रक्कम भरावी लागत नाही, तर बॅटरीसाठी केवळ महिन्याचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. यामुळे वाहनाची मूळ किंमत थेट निम्म्यावर येते. खर्चाचा हिशोब केल्यास फक्त 1 रुपयाच्या खर्चात ही स्कूटर 4 किलोमीटर अंतर सहज पार करते. अंदाजे 3kWh क्षमतेची बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी केवळ 24 रुपये खर्च येतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर जवळपास 100 किलोमीटरची रेंज देते, जी पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त पडत आहे.
Vida, TVS आणि Ola चे सर्वात परवडणारे पर्याय
कमी बजेटमध्ये स्कूटर शोधणाऱ्यांसाठी सध्या बाजारपेठेत अनेक उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध आहेत. यात हिरो कंपनीची Vida VX2 ही स्कूटर BaaS अंतर्गत फक्त 44,990 रुपयांमध्ये खरेदी करता येते, ज्यामध्ये 2.2 kWh बॅटरी आणि 92 किलोमीटरची रेंज मिळते. अधिक रेंज हवी असल्यास याचा 3.4 kWh चा व्हेरियंट 60,000 रुपयांत (BaaS) उपलब्ध आहे, जो 142 किलोमीटर चालतो आणि त्याची विना सबस्क्रिप्शन पूर्ण किंमत 77,590 रुपये आहे.
याशिवाय TVS Orbiter चे मॉडेल्स 49,999 रुपयांपासून सुरू होतात, जे व्हेरियंटनुसार 86km ते 158km धावतात. ओला कंपनीची Ola S1X ही 2kWh बॅटरी असणारी स्कूटर 49,999 रुपयांत 108 km ची रेंज देत मध्यमवर्गीयांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.
हेही वाचा – Water Powered Cars: पेट्रोल-डिझेल सोडा, आता पाण्यावर धावणार वाहनं? जाणून घ्या काय आहे हे 'मॅजिक इंधन'
अथरचे प्रीमियम आणि विश्वासार्ह मॉडेल्स
ज्यांना चांगली बिल्ड क्वालिटी आणि प्रीमियम फीचर्स हवे आहेत, त्यांच्यासाठी एथर (Ather) कंपनी देखील आता सबस्क्रिप्शन सुविधीसह आपले मॉडेल विकत आहे. एथरचे कौटुंबिक वापरासाठीचे Rizta मॉडेल 75,999 रुपयांपासून उपलब्ध आहे. तर दुसरीकडे तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेली Ather 450 ही स्कूटर 84,341 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत शोरूममध्ये विक्रीसाठी सज्ज आहे. विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांमुळे या स्कूटरला नोकरदार वर्गाकडून चांगली पसंती मिळत आहे.
पर्यावरणपूरक आणि स्मार्ट प्रवासाची निवड
पेट्रोलच्या दरातील रोजचे चढ-उतार पाहता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडणे केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. शून्य प्रदूषण, आधुनिक डिझाईन आणि कमी देखभाल खर्च यामुळे या स्कूटर्स शहरांपासून गावांपर्यंत लोकप्रिय होत आहेत. रोजच्या ऑफिस किंवा कॉलेजच्या प्रवासातील इंधनाचा मोठा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक आता जवळच्या शोरूमला भेट देऊन आपल्या आवडीचे मॉडेल बुक करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.