AAP Post On Bihar Election: बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष भाजपप्रणित एनडीएच्या प्रचंड बहुमताकडे वळले. 202 जागांसह एनडीएने जवळपास एकतर्फी आघाडी घेतली, तर महागठबंधन केवळ 35 जागांवर थांबले. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपच्या रणनीतीचे कौतुक होत असताना, आम आदमी पक्षाने मात्र या विजयाचा श्रेय एका वेगळ्याच व्यक्तीला दिल्याचा दावा करून राजकीय वातावरण तापवले आहे.
आप पक्षाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, ‘भाजपचे मंत्री, नेते आणि आमदार त्यांच्या मतदारसंघात गेल्यानंतर त्यांना तिथल्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही ठिकाणी तर त्यांच्यावर चिखल आणि शेणही फेकण्यात आलं. या बंपर विजयाचा हिरो ना मोदी, ना नितीश कुमार, ना अमित शाह…आहेत. बिहारच्या विजयाचे शिल्पकार हे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या जिवावरच मोदींनी त्यांचा गमछा फिरवला. बिहारमध्ये निवडणूक आयोगाने SIR पद्धत रावबली आणि निवडणूक आधीच सेट केली,’ असा दावा आपने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
आपच्या मते, बिहार निवडणुकीत प्रथमच राबवण्यात आलेली SIR पद्धती संशयास्पद आहे. पक्षाने दावा केला की ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने अवलंबल्यामुळे निकाल ‘सेट’ होता आणि म्हणूनच भाजपला अनपेक्षितप्रमाणे मोठा विजय मिळाला. आपचे खासदार संजय सिंह यांच्या आधीच्या वक्तव्याचा संदर्भही व्हिडिओमध्ये जोडण्यात आला आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी “SIR पद्धती निष्पक्ष नाही” असे म्हटले होते.
हेही वाचा – Bihar Cabinet Formation: बिहार मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला! कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?
निकालातील प्रमुख आकडेवारी
बिहारच्या या निवडणुकीत अनेक राजकीय गणिते बदलली. सर्वात प्रभावी कामगिरी एनडीएची ठरली. एनडीएने एकूण 202 जागा जिंकल्या. यात भाजपने 89 कमळ फुलवले. तर जेडीयूने 85 जागा जिंकल्या. तथापी, एलजेपीने 19, एचएएमने 5, आरएलएमने 4 आणि महागठबंधन आघाडीने फक्त 35 जागा जिंकल्या. एनडीएच्या या मोठ्या विजयामुळे बिहारच्या राजकारणातील नवा अध्याय सुरू झाला असला, तरी आपने उपस्थित केलेल्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.