Shivsena Leader Daughter Death: पंजाबमधील शिवसेना नेते दीपक कंबोज यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कंबोज यांची 22 वर्षीय मुलगी मुनमुन चितवान हिचा तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच बाथरूममध्ये गिझरच्या गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाला. ज्या घरात वाढदिवसाचा उत्साह होता, तिथे आता शोककळा पसरली आहे.
वाढदिवसाचा उत्साह शोकात बदलला
मिळालेल्या माहितीनुसार, मुनमुनचा वाढदिवस असल्याने घरी आनंदाचे वातावरण होते. नातेवाईक आणि मित्रांना उत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, दुपारी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेल्या मुनमुनचा गॅस गिझरमधील बिघाडामुळे गुदमरून मृत्यू झाला. मुनमुन बाथरूममध्ये असताना गॅस गिझरमधून मोठ्या प्रमाणावर गळती झाली. बाथरूम बंद असल्याने काही वेळातच तिथे गॅस साचला आणि मुनमुनला श्वास घेण्यास त्रास होऊन ती बेशुद्ध पडली.
दरम्यान, बराच वेळ होऊनही मुनमुन बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी मुनमुन आत बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हेही वाचा – Fast Tag Rules: आता टोल नाक्यावर गाड्या थांबणार नाहीत; फास्टॅग नियमात मोठा बदल; वाचा सविस्तर
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी दुपारी मुनमुनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपक कंबोज यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या मुलीच्या आठवणींना उजाळा दिला. मुनमुन अत्यंत सुशिक्षित, मैत्रीपूर्ण आणि हसमुख स्वभावाची होती. तिच्या जाण्याने कंबोज कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.