ACB Action : तेलंगणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत एक मोठी कारवाई करत महबूबनगर जिल्ह्याचे उप परिवहन आयुक्त (DTC) मूड किशन यांच्या अफाट संपत्तीचा पर्दाफाश केला आहे. अधिकृत पगार लाखात असताना या अधिकाऱ्याने शेकडो कोटींचे साम्राज्य उभे केल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.
पगार आणि संपत्तीचा मेळ लागेना
मूड किशन ज्या पदावर कार्यरत आहेत, तिथे दरमहा सुमारे 1 लाख ते 1.25 लाख रुपये वेतन मिळते. मात्र, एसीबीने किशन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या 11 ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात जी माहिती समोर आली ती चक्रावून टाकणारी आहे. सरकारी कागदपत्रांनुसार जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत 12.72 कोटी रुपये असली, तरी बाजारभावानुसार (Market Value) या मालमत्तेची खरी किंमत 100 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हॉटेल व्यावसायिक ते फर्निचर शोरूमचे मालक
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, किशन यांनी केवळ जमिनीच घेतल्या नाहीत, तर विविध व्यवसायांत मोठी गुंतवणूक केली आहे. 'लहरी इंटरनॅशनल' हॉटेलमध्ये त्यांची 50 टक्के भागीदारी असून निजामाबाद येथे 3,000 चौरस फुटांचे एक आलिशान प्रीमियम फर्निचर शोरूमही त्यांच्या मालकीचे आहे. याशिवाय निजामाबाद नगरपालिका हद्दीत 10 एकर व्यावसायिक जमीन आणि संगारेड्डी जिल्ह्यात 31 एकर शेतजमीन असल्याचे समोर आले आहे. एकट्या या शेतजमिनीची बाजारपेठ किंमत 62 कोटी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – Nitin Gadkari : 'दिल्लीत 3 दिवस राहिलो तरी मला अॅलर्जी..'; प्रदूषणावर नितीन गडकरींचे रोखठोक भाष्य
आलिशान गाड्या आणि सोन्याची झळाळी
छाप्यादरम्यान केवळ स्थावर मालमत्ताच नाही, तर मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि दागिनेही सापडले आहेत. एसीबीने 1.37 कोटी रुपयांची बँक शिल्लक फ्रीज केली असून, 1 किलोहून अधिक सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. तसेच त्यांच्या ताफ्यात 'इनोवा क्रिस्टा' आणि 'हौंडा सिटी' यांसारख्या अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे. निजामाबादमधील अशोक टाऊनशिपमध्ये दोन फ्लॅट्स आणि संगारेड्डी येथे आधुनिक 'पॉलीहाऊस' सुविधाही त्यांच्या नावावर आहे.
कायदेशीर कारवाई आणि एसीबीचा इशारा
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13(1)(b) आणि 13(2) अन्वये मूड किशन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसेवक असताना रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात बेकायदेशीरपणे साम्राज्य उभे करणे, हा फौजदारी गुन्हा असल्याचे एसीबीने म्हटले आहे. या कारवाईद्वारे एसीबीने भ्रष्ट अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला असून, तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासनही जनतेला दिले आहे.
हेही वाचा – Gujrat Kachchh Earthquake: फॉल्ट लाईन्सचा खेळ! कच्छमधील सततच्या भूकंपांमागे 'या' मुख्य यंत्रणा जबाबदार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.