Nila Vikhe Patil Sweden Parliament: महाराष्ट्राच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज विखे पाटील घराण्याच्या कन्या नीला विखे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात ऐतिहासिक यश संपादन केले आहे. स्वीडनच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून त्यांची स्वीडनच्या ‘रिक्सदाग’ (Riksdag) या 349 सदस्यांच्या संसदेवर निवड झाली आहे. डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षांच्या आघाडीने निसटते बहुमत मिळवल्यानंतर नीला विखे पाटील यांनी स्वीडिश संसदेत आपले स्थान पक्के केले आहे. त्या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.
आजोबांच्या आठवणी आणि महाराष्ट्रातील बालपणाचा प्रवास
नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला, तरी त्यांचे सुरुवातीचे बालपण आणि शिक्षण अहिल्यानगर येथे झाले. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत. विजयानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मी 15 वर्षांची असताना माझ्या आजोबांनी मला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला लावला होता. आजोबा हयात असताना दर आठवड्याला मला फोन करायचे. मी त्यांचा वारसा आणि अभिमान पुढे नेईन,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. स्वीडनमध्ये कार्यरत असल्या तरी महाराष्ट्राशी आणि भारताशी आपले कौटुंबिक व भावनिक नाते आजही घट्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
News Alert ! Maharashtra educationist’s daughter Nila Vikhe Patil of Green Party elected to Swedish Parliament: Official. — Press Trust of India (@PTI_News) September 19, 2026
आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखानदारांचा वारसा
विखे पाटील कुटुंबाला महाराष्ट्रातील सहकार चळवळ, शिक्षण आणि राजकारणाचा मोठा आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नीला यांचे पणजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून सहकार क्रांतीची पायाभरणी केली होती. त्याच पुरोगामी आणि सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगणाऱ्या नीला यांनी स्वीडिश राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करून थेट संसदेपर्यंत मजल मारली आहे.
स्वीडनमधील राजकीय उलथापालथ आणि सरकार स्थापनेचे आव्हान
यंदाच्या स्वीडन निवडणुकीत 4 डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षांच्या आघाडीने एकूण 176 जागांवर विजय मिळवला आहे. मावळत्या हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) पक्षाच्या आघाडीपेक्षा ही संख्या अवघ्या 3 जागांनी जास्त आहे. या निसटत्या पराभवानंतर पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. माजी पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांचा ‘सोशल डेमोक्रॅट्स’ पक्ष 99 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी विरोधी आघाडीतील अंतर्गत मतभेदांमुळे नवीन सरकार स्थापन करताना त्यांना मोठ्या वाटाघाटी कराव्या लागणार आहेत.
जागतिक व्यासपीठावर मराठी नेतृत्वाचा डंका
भारतातील एका प्रमुख राजकीय आणि सामाजिक कुटुंबातील कन्येने युरोपियन देशाच्या संसदेत विजय मिळवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वीडनच्या धोरणनिर्मितीत आणि संसदीय कामकाजात आता महाराष्ट्राच्या कन्येचा थेट सहभाग असणार आहे. नीला विखे पाटील यांच्या या यशामुळे जागतिक राजकारणात भारतीय वंशाच्या आणि विशेषतः मराठी नेतृत्वाचा ध्वज पुन्हा एकदा दिमाखात फडकला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.