Godzilla El Nino: हवामान विभागाचा मोठा इशारा; देशावर ‘गॉडझिला’चे संकट; पुढील 3 महिन्यात नेमकं काय घडणार?

जागतिक हवामान संघटनेने (WMO) 'गॉडझिला अल निनो' या अत्यंत तीव्र हवामान प्रणालीबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
Godzilla El Nino: हवामान विभागाचा मोठा इशारा; देशावर ‘गॉडझिला’चे संकट; पुढील 3 महिन्यात नेमकं काय घडणार?

Godzilla El Nino: जागतिक हवामान बदलाचे तीव्र परिणाम आता भारतावर दिसू लागण्याची शक्यता असून, पुढील तीन महिने देशासाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत. जागतिक हवामान संघटनेने (WMO) 'गॉडझिला अल निनो' या अत्यंत तीव्र हवामान प्रणालीबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. यामुळे देशातील काही भागांत तीव्र पाणीटंचाई व दुष्काळ, तर काही भागांत ढगफुटीसदृश मुसळधार पूर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, दुसरीकडे महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत वादळी पावसाची शक्यता वर्तवत 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

पावसात घट आणि शेतीचे नुकसान 
हवामान तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, या 'गॉडझिला अल निनो'च्या प्रभावामुळे देशातील मान्सूनच्या चक्रात मोठा बिघाड होऊ शकतो. यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणे, उन्हाची तीव्रता अचानक वाढणे आणि पर्यायाने जलसाठे कोरडे पडणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. याचा थेट फटका देशातील शेती क्षेत्राला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भारतासाठी दिलासादायक बाब
जागतिक पातळीवर हे संकट भीषण असले, तरी भारताच्या दृष्टीने एक आशेचा किरण अजूनही जिवंत आहे. सध्या हिंदी महासागरातील 'आयओडी' (Indian Ocean Dipole) आणि 'एमजेओ' (Maddem-Julian Oscillation) या दोन सागरी हवामान प्रणाली सक्रिय आहेत. या दोन्ही प्रणाली अल निनोचा प्रभाव कमी करण्यास आणि भारताचे संभाव्य दुष्काळापासून रक्षण करण्यास मदत करू शकतात, असा अंदाज आहे.

हेही वाचा – Fishing Ban Raigad: वादळी वारे अन् उंच लाटांचा धोका; रायगड जिल्ह्यात 6000 पेक्षा जास्त बोटी किनाऱ्यावर विसावल्या

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व हालचालींना वेग 
एकीकडे जागतिक हवामानाची चिंता असतानाच, महाराष्ट्रात मात्र मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह एकूण ९ जिल्ह्यांचा समावेश असून, येथे प्रशासनातर्फे 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. अचानक येणाऱ्या या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version