सिंधू पाणी करार थांबवला तर ‘युद्ध’ मानू; पाकिस्तानचा भारताला इशारा

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी थांबवले; पाकिस्तानचा शिमला करार रद्द, व्यापार-व्हिसा बंदी, हवाई व स्थलसीमा बंद करत तीव्र प्रतिक्रिया.

सिंधू पाणी करार थांबवला तर ‘युद्ध’ मानू; पाकिस्तानचा भारताला इशारा

दिल्ली :भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्ताननेही तीव्र भूमिका घेत भारतासोबतचा शिमला करार रद्द करत सर्व द्विपक्षीय करार स्थगित केल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर उपखंडातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून दोन्ही देशांतील तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्ष पंतप्रधान शाहबाज शरीफ होते. बैठकीत भारताने सिंधू पाणी करार थांबवल्यास तो 'ॲक्ट ऑफ वॉर' म्हणजेच युद्धासारखा गुन्हा मानू, असा स्पष्ट इशारा पाकिस्तानकडून देण्यात आला आहे.

या बैठकीत पाकिस्तानकडून पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
पाकिस्तानने सार्क एसव्हीई अंतर्गत सर्व व्हिसा निलंबित केले आहेत. शीख यात्रेकरूंना वगळता सर्व भारतीय नागरिकांना 48 तासांच्या आत परतण्याचे आदेश दिले आहेत. भारतासोबतचा सर्व व्यापार थांबवण्यात आला आहे. सर्व भारतीय मालकीच्या आणि भारतीय संचालित विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. वाघा बॉर्डरही बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: हल्ला करणारे मुस्लिम नाहीत तर … पहलगाम हल्ल्यानंतर गायक सलीम मर्चंट संतापला

शिमला करार म्हणजे काय?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 जुलै 1972 रोजी शिमला करार झाला होता. हा करार 1971 च्या युद्धानंतर झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाला  आणि भारताने पाकिस्तानचे 90,000 पेक्षा अधिक सैनिक बंदी ठेवले होते. या करारावर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

पण आता हा करार पाकिस्तानने रद्द केल्याने दोन्ही देशांतील परराष्ट्र धोरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

भारताची कडक कारवाई
भारत सरकारने बुधवारी रात्री पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना 'पर्सोना नॉन ग्राटा' घोषित करत अधिकृत नोट दिली आहे. त्यांना एका आठवड्यात भारत सोडण्यास सांगितले आहे. 'पर्सोना नॉन ग्राटा' म्हणजे “अस्वीकार व्यक्ती”, ही संज्ञा त्या व्यक्तीस लागू होते जिचे देशात रहाणे अयोग्य समजले जाते.

पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी आणि हवाई हालचालींनी तणाव वाढला
या घडामोडींनंतर पाकिस्तानने 24-25 एप्रिल रोजी कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे, कराची एअरबेसवरून 18 लढाऊ विमाने भारताच्या सीमेवरील हवाई तळांवर पाठवण्यात आली आहेत.भारत सरकारने पाकिस्तान सरकारच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर बंदी घातली असून अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने त्यांच्या नागरिकांना जम्मू-काश्मीरला प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण वळणावर आहेत. शिमला करारासारखा ऐतिहासिक करार रद्द होणे ही केवळ द्विपक्षीय संबंधांचीच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियाच्या स्थैर्याची गंभीर चिंता निर्माण करणारी बाब आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number