Pregnancy Job Scam: बिहारच्या नवादा जिल्ह्यातून सायबर फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. 'ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब सर्व्हिस' (All India Pregnancy Job Service) या नावाखाली एक टोळी चालवली जात होती, ज्याद्वारे लोकांना निपुत्रिक महिलांना गर्भवती करण्याच्या बदल्यात 10 लाख रुपये कमवण्याचे आमिष दाखवले जात होते. नवादा पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून, हिसुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनवा गावातून दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा आणि रंजन कुमार नावाच्या तरुणाचा समावेश आहे.
हेही वाचा – BMC Election : मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला; योगेश कदम विरोधकांवर संतापले
या घोटाळ्याची कार्यपद्धती अत्यंत किचकट आणि लोकांच्या संवेदनशीलतेचा फायदा घेणारी होती. फसवणूक करणारे भामटे लोकांना फोन करून निपुत्रिक जोडप्यांना मदत करण्याचा बनाव रचत असत. "जर तुम्ही निपुत्रिक महिलेला गर्भवती केले, तर तुम्हाला मोठी रक्कम मिळेल," असे सांगून ते बेरोजगार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांना जाळ्यात ओढत असत. विश्वास संपादन केल्यानंतर, नोंदणी शुल्काच्या (Registration Fee) नावाखाली या टोळीने हजारो ते लाखो रुपये उकळले आहेत. केवळ पुरुषांनाच नव्हे, तर निपुत्रिक महिलांनाही 'विशेष तंत्राद्वारे' गर्भधारणा करून देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून विविध टप्प्यांवर पैसे उकळण्यात आले. अनेक महिलांनी सामाजिक भीतीपोटी या त्रासाची तक्रारही केली नव्हती.
पोलीस अधीक्षक अभिनव धीमान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत आरोपींकडून चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीत या टोळीने लाखो रुपये कमावल्याची कबुली दिली आहे. सायबर सेल आता जप्त केलेले फोन, चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सची तपासणी करत असून, हे रॅकेट किती मोठे आहे, याचा शोध घेतला जात आहे. हा केवळ आर्थिक गुन्हा नसून सामाजिक आणि नैतिक मूल्यांना धक्का देणारा प्रकार आहे, असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. सध्या याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे नेटवर्क इतर जिल्ह्यांतही पसरलेले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.