Gaurav Gogoi Slams BJP: NEET पेपर फुटल्याच्या प्रकरणानंतर 37 दिवसांच्या तीव्र आंदोलनापुढे झुकत धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र, राजीनाम्यानंतर ते संसदेत पोहोचले असता भाजपच्या खासदारांनी त्यांचे शाल, टोपी आणि पुष्पहार घालून जोरदार स्वागत केले. या घटनेवर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत जोरदार आक्षेप नोंदवला. पाकिस्तानसोबत युद्ध जिंकून आल्यासारखे भाजपने त्यांचे स्वागत केले, अशी जळजळीत टीका गोगोई यांनी ‘सार्वजनिक परीक्षा (अन्फेअर मीन्स प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026’ वर बोलताना केली.
21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आणि प्रियंका गांधींचा निशाणा
या संपूर्ण पेपरफुटीच्या गोंधळामुळे आणि अनिश्चिततेमुळे निराश होऊन सुमारे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीदेखील भाजपवर जोरदार टीका केली. ज्या परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला ते संपूर्ण देशाने पाहिले आहे; तरीही संसदेच्या आवारात त्यांचे सुपरस्टारसारखे स्वागत होणे अत्यंत लाजिरवाणे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राहुल गांधींची ‘एक्स’ वर संतप्त पोस्ट
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या स्वागताचा तीव्र निषेध नोंदवला. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचाराचे आणि उद्ध्वस्त शिक्षणव्यवस्थेचे प्रतीक आहेत. लाखो तरुणांचे भवितव्य टांगणीला लागल्यामुळे आणि जनतेच्या तीव्र रोषामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला. भाजप खासदारांनी त्यांचे केलेले स्वागत हा सन्मान नसून लाखो मुलांच्या उद्ध्वस्त भविष्याचा उत्सव आहे, अशी टीका त्यांनी केली.
धर्मेंद्र प्रधान के शिक्षा मंत्री रहते 21 बच्चों ने अपनी जान दे दी… जब वे इस्तीफा देने के बाद संसद परिसर में आए तो BJP सांसदों ने उनका ऐसे स्वागत किया, जैसे वो पाकिस्तान से जंग लड़कर आए हों। : लोकसभा में कांग्रेस के उपनेता @GauravGogoiAsm जी pic.twitter.com/Jb2iBbjpPN — Congress (@INCIndia) July 28, 2026
‘सीजेपी’चे जंतर-मंतरवरील आंदोलन आणि परीक्षा रद्द
NEET पेपरफुटी उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावरून एकत्र आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या तरुण-विद्यार्थ्यांच्या संघटनेने दिल्लीच्या जंतर-मंतरवर मोठे आंदोलन उभारले होते. हे आंदोलन हळूहळू संपूर्ण देशात पसरले. सरकारच्या वतीने या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आणि मे महिन्यात झालेली परीक्षा रद्द करून जूनमध्ये फेरपरीक्षेचे आदेश देण्यात आले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
संसदेत अँटी-पेपर लीक दुरुस्ती विधेयकावर वाद
केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी आणलेल्या नवीन कडक कायद्यावर संसदेत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरत, आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचा आणि अश्रूधुराचा जबाब मागितला आहे. विद्यार्थ्यांचे प्राण गेले असताना आणि भवितव्य टांगणीला लागले असताना अशा प्रकारे माजी मंत्र्यांचा सत्कार करणे नैतिकतेला धरून नाही, असा सूर विरोधी पक्षांनी लावला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.