मुंबई: राज्यभरात अन्न भेसळी विरोधात बेधडक कारवाई करत सर्वसामान्यांच्या आरोग्याचे रक्षण करणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे अनेकदा चर्चेत असतात. बॉम्बे हायकोर्टच्या कॅन्टीन वरील कारवाईनंतर पुन्हा एकदा सरकारी आस्थापनांवर FDA ने कडक कारवाई केली. अन्न साठवणूक आणि प्रक्रिया क्षेत्रामध्ये उघडे ठेवलेले अन्न, स्वयंपाकघरातील निकृष्ट सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेतील हलगर्जीपणा आढळून आल्यानंतर एफडीएने (FDA) इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) येथील बेस किचनचा परवाना निलंबित केला आहे.
एफडीएने मुंबईतील रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या पाच आयआरसीटीसी बेस किचन आणि फूड प्लाझांची तपासणी केली. कुर्ला (पश्चिम) येथील ॲसोसिएटेड हॉटेलियर्स प्रा. लि. चा परवाना निलंबित करण्यात आला, तर इतर चार आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या.एफडीएच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 2 सप्टेंबर रोजी झालेल्या तपासणीत कुर्ला येथील स्वयंपाकघराला 114 पैकी 69% गुण मिळाले.
IRCTC च्या बेस किचनमधल्या त्रुटी –
त्यात अधिकाऱ्यांना अन्न साठवणूक आणि प्रक्रिया करण्याच्या ठिकाणी झुरळे सापडणे, कचऱ्याजवळ अन्न तयार करणे, 17 तुटलेल्या फरशा आणि तसेच एलपीजी सिलिंडरजवळ अन्न प्रक्रिया केली जात असल्याचे आढळले. भांडी आणि अन्नाच्या संपर्कात येणारी उपकरणे देखील अस्वच्छ आणि काही ठिकाणी गंजलेली आढळली.
या रेस्टोरंट्सना मिळाली नोटीस…
चेंबूर येथील ओम साई राम एंटरप्रायजेस, अंबूज हॉटेल्स, पवईचे एक्सप्रेस फूड सर्व्हिसेस आणि ठाण्याच्या कोपरी येथील अराहा हॉस्पिटॅलिटीला स्वच्छतेत सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएने काही आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये मालाड पश्चिमेतील झेप्टो स्टोअर असलेले ड्रोघेरिया सेलर्स, मुलुंडमधील कोठारी स्वीट्स, मुलुंड फरसाण मार्ट आणि महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बॉम्बे द फूड फ्युजन कॅफे (घाटकोपर) आणि श्री मधुरम (बोरिवली पूर्व) यांच्यावरही एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे.
खारघर येथील 'मातेश्वरी मिल्क'मध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना गंभीर अनियमितता आढळून आल्या. पाश्चरायझेशनची कोणतीही प्रक्रिया न करता 'पाश्चराइज्ड दूध' म्हणून विक्री करणे आणि सुट्या दुधाबाबत ग्राहकांची फसवणूक करणे, असे प्रकार समोर आले. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करता एफडीएने या डेअरीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे.