CJP Protest Continue after Dharmendra Pradhan's Resignation: केंद्रातील मोदी सरकार सहजासहजी राजीनामे घेत नाही असा समज होता, परंतु तरुणांच्या एकजुटीच्या ताकदीपुढे अखेर सरकारला नमावे लागले आहे. नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) या संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला यामुळे मोठे यश मिळाले मानले जात आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा ही तर केवळ सुरुवात असून लोकशाहीचा हा मोठा विजय असल्याचा दावा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आंदोलकांशी बोलताना केला.
आंदोलन संपलेले नाही; सीजेपी मैदानात कायम
धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडल्यामुळे जंतर-मंतर येथील आंदोलन आता संपुष्टात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सीजेपीने मैदानातून माघार घेण्यास ठाम नकार दिला आहे. आम्ही सहजासहजी मैदान सोडणार नसून आमचा लढा असाच सुरू राहील, असे अभिजित दीपके यांनी हजारो आंदोलक तरुणांशी संवाद साधताना स्पष्ट केले. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा आमच्या मुख्य मागण्यांपैकी फक्त एक भाग होता, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारपुढे आणखी 2 महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.
पीडित कुटुंबांना मदत आणि दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी
सीजेपीने प्रशासनासमोर ठेवलेल्या मागणीनुसार, नीट पेपरफुटीच्या तणावातून आत्महत्या केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पीडित कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली पाहिजे. याशिवाय, 20 जुलैनंतर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या तरुणांवर अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून ज्या पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, त्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा आणि सचिन शर्मा यांच्यावर कारवाई करण्याची थेट मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची अट
आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे. 20 जुलैनंतर झालेल्या आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थी आणि तरुणांवर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत, ते सर्व गुन्हे तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी दीपके यांनी केली आहे. आता या 2 प्रमुख मागण्यांवर केंद्र सरकार काय भूमिका घेते आणि जंतर-मंतरवरील आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.