अनेकदा रॉंग नंबरवरून येणारे मिस कॉल आपण दुर्लक्षित करतो. मात्र एखाद्या चित्रपटात घडावं अशी घटना बिहारमध्ये घडली आहे. एका मिस कॉलमुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलले आहे. एका मिस कॉलमुळे झालेल्या ओळखीवर चक्क 5 मुलांच्या आईने एका 19 वर्षीय तरुणासोबत संसार थाटला आहे. ही घटना खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खदुई बरियारपूर गावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील पूर्णिया येथील 40 वर्षीय बिंदू देवी (उर्फ सीमा परवीन) हिची कोलकातामधील जमुई येथील 19 वर्षीय महावीर ठाकूरशी एका मिस कॉलमुळे ओळख झाली. त्यानंतर दोन वर्ष ते एकमेकांसोबत वारंवार बोलत असायचे. हळूहळू त्यांच्यातील जवळीक वाढली आणि त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. दोघांनी कोलकाता येथेील एका मंदिरात विवाह केला आणि त्यानंतर हे जोडपे त्याच्या गावी परतले. मात्र, त्यांचे लग्न काही गावकऱ्यांना पसंत पडले नाही आणि त्यांनी पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली.
परिणामी, त्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले, जिथे त्यांनी एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. महावीर ठाकूर हा खैरा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील खदुई बरियारपूर गावचा रहिवासी आहे, तर 40 वर्षीय बिंदू देवी (उर्फ सीमा परवीन) ही पूर्णिया जिल्ह्यातील आहे. ती आधीच विवाहित असून तिला पाच मुले आहेत. या जोडप्याने कुटुंबीयांच्या संमतीशिवाय घर सोडले, कोलकाता गाठले आणि विवाह केला. लग्नानंतर त्यांनी एक व्हिडिओही जारी केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली.