मुंबई : बुधवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे होणारे अपघात कमी करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून, मुंबई रेल्वे पोलिसांनी उपनगरीय रेल्वे जाळ्यातील 38 'अपघात प्रवण क्षेत्रांची' (accident hotspots) जबाबदारी स्वीकारली आहे. चिन्हांकित केलेल्या 38 'हॉटस्पॉट्स'पैकी 27 हॉटस्पॉट्स मध्य रेल्वे विभागात, तर 11 पश्चिम रेल्वे विभागात आहेत. आयुक्तलयाच्या स्तरावर, या हॉटस्पॉट्सवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे. यामध्ये मध्य रेल्वे विभाग (सीएसएमटी) आणि पश्चिम रेल्वे (चर्चगेट) येथील पोलीस उपायुक्त, तसेच सीएसएमटी, कल्याण, वांद्रे, हार्बर आणि वसई विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे. दरम्यान, जानेवारी ते ऑगस्टदरम्यान रेल्वे अपघातांत 310 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी जखमी झाल्याची नोंद आहे. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर 242, तर पश्चिम रेल्वे मार्गावर 68 मृत्यूची नोंद आहे. रेल्वे रूळ ओलांडणे हे रेल्वे अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. यासाठी अनधिकृत प्रवेशद्वार बंद करणे, फेन्सिंग वाढवणे, FOB-सबवे उभारण्याच्या सूचना देणे, संवेदनशील ठिकाणी रेल्वे पोलिसांची कडक पाळत आणि जनजागृती मोहीम सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे काही मुद्दे उपस्थित केले असून, संबंधित ठिकाणे अधिक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजनांची मागणी करणारे पत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिले आहे. यामध्ये रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांकडून वापरले जाणारे अनधिकृत प्रवेशमार्ग त्वरित बंद करणे, प्रवाशांना रुळ ओलांडण्यापासून रोखण्यासाठी कुंपण घालणे आणि जिथे कुंपण खूपच कमी उंचीचे आहे तिथे त्याची उंची वाढवणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.
तसेच, पोलिसांनी तुटलेल्या संरक्षक भिंतींची दुरुस्ती आणि कमी उंचीच्या संरक्षक भिंतींची उंची वाढवण्याची मागणीही केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या सोयीसाठी पादचारी पूल (फूट ओव्हरब्रिज), भुयारी मार्ग (सबवे) आणि रस्ते पूल (ROB) बांधण्याची सूचनाही करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या उपाययोजना लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील याची खात्री करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याबाबत नियमित पाठपुरावा केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम राबवली जात आहे. यात 'खाकी सखी' पथकातील कर्मचारी फलक घेऊन प्रवाशांना रूळ न ओलांडण्याचे आवाहन करत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून ध्वनिक्षेपकाद्वारेही सूचना दिल्या जात आहेत. तसेच, रेल्वे रूळ ओलांडण्यातील धोक्यांविषयी प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्ये सादर केली जात आहेत.
पोलिसांकडून शाळा, महाविद्यालये आणि झोपडपट्ट्यांमध्येही जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत; याद्वारे रेल्वे सुरक्षेबाबत प्रवासी आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले जात आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर प्रवाशांनी रूळ ओलांडल्यामुळे होणारे अपघात कमी करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. रेल्वे सुरक्षा सुधारण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या व्यापक प्रयत्नांचाच एक भाग म्हणून हे उपाय योजले जात आहेत. महाराष्ट्रातील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग्ज (रेल्वे फाटक) पूर्णपणे बंद करण्याच्या उद्देशाने, पुढील तीन वर्षांत 145 रेल्वे ओव्हरब्रिज (उड्डाणपूल) बांधण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. या प्रकल्पांमुळे रस्ते सुरक्षा सुधारण्यास, वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि रेल्वे क्रॉसिंग्जवरील अपघात रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.