Wife Killed Husband with the help of Boyfriend : पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मूळचे झारखंडमधील देवधर जिल्ह्याचे रहिवासी असलेले 42 वर्षीय जन्मजयकुमार तीर्थ राय यांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी पोलिसांना मिळाली होती. आरोपींनी सुरुवातीला हा प्रकार निव्वळ एक अपघात किंवा आत्महत्या असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मृत जन्मजयकुमार यांच्या पत्नीने सुरुवातीला पोलिसांना खोटी माहिती दिली होती, मात्र पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे हा संपूर्ण कट उधळला गेला असून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुजरातच्या सुरत शहरातील वेद रोड परिसरातील रहमतनगर येथे ही घटना घडली.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बिंग
सुरुवातीला जरी हा आत्महत्येचा प्रकार वाटत असला तरी शवविच्छेदन (Post-Mortem) अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. जन्मजयकुमार यांच्या मानेवर गंभीर जखमा होत्या आणि मेंदूमध्ये प्रचंड रक्तस्राव झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले. संशय बळावल्यामुळे चौक बाजार पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून पाहणी सुरू केली. या पाहणीदरम्यान पोलिसांना एका संशयित व्यक्तीची संशयास्पद हालचाल आढळून आली. अधिक तपास केला असता, त्या व्यक्तीचे नाव शुलभ सिंग बंबहादूर सिंग असल्याचे निष्पन्न झाले, जो मृत जन्मजयकुमार यांची पत्नी चांदनी कुमारी हिचा बॉयफ्रेंड होता. यानंतर सर्व सर्व प्रकार उघडकीस आला.
झोपेत असताना पहिल्यांदा खाली फेकले, नंतर गळा चिरला
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. चांदनी कुमारी आणि शुलभ सिंग यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते आणि त्यांना पतीचा अडसर दूर करून एकत्र राहायचे होते, म्हणूनच त्यांनी जन्मजयकुमार यांना संपवण्याचा कट रचला. 7 जून रोजी जन्मजयकुमार गाढ झोपेत असताना चांदनीने त्यांना घराच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली ढकलून दिले. एवढ्या उंचावरून खाली पडूनही जेव्हा पती जिवंत असल्याचे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा प्रियकर शुलभ सिंग याने क्रूरतेची सीमा ओलांडत रेझर ब्लेडने जन्मजयकुमार यांचा गळा चिरून त्यांची हत्या पूर्ण केली.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
पतीच्या मृत्यूनंतर आत्महत्येचा बनाव रचण्याचा पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडचा हा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. सुरतचे डीसीपी राघव जैन यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अत्यंत निर्घृण हत्याकांडप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या हत्येमागील इतर आर्थिक किंवा कौटुंबिक बाबींचा आणि या गुन्ह्यात कोणी सहभागी होते का, याचा सखोल तपास करत आहेत.
हेही वाचा – Nerul Crime News : नेरुळ हादरलं! 'बिनकामाचा' टोमणा सहन होईना; पतीने पत्नीसह सासूवरही केले चाकूने सपासप वार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.