US Marine Arrested at India Nepal Border: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्हा अंतर्गत येणाऱ्या भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी एका अमेरिकन नागरिकाला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. जॉर्डन ब्राऊन असे या अटक करण्यात आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीचे नाव असून, तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. कोणत्याही वैध पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय नेपाळच्या हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले. आपण अमेरिकन नौदलाचा (US Navy) आणि स्पेशल फोर्सचा माजी सैनिक (Special Services Commando) असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. सध्या या संदर्भातील माहिती अमेरिकन दूतावासाला देण्यात आली असून, सुरक्षा यंत्रणांकडून त्याची सखोल चौकशी केली जात आहे.
लष्करी जवानांनी पाठलाग करून ठोकल्या बेड्या
सशस्त्र सीमा दलाच्या (SSB) जवानांनी सोनौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅनहवा परिसरात गस्त घालत असताना ही कारवाई केली. 11 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद हालचालींमुळे एसएसबीच्या जवानांनी जॉर्डनला पडताळणीसाठी रोखले असता, त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जवानांनी पाठलाग करून नाट्यमयरीत्या त्याला गर्दीतून पकडले. झडतीदरम्यान जॉर्डनकडे 31,460 रुपये रोख आणि 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तो थेट बंगळुरूहून प्रवास करत सोनौली सीमेवर पोहोचला होता आणि तिथून गुप्तपणे सीमा ओलांडण्याच्या प्रयत्नात होता.
हेही वाचा – Middle East Conflict: 'होर्मुझमधील जहाजांवर हल्ले खपवून घेणार नाही'; भारताचा इराणला कडक शब्दांत इशारा
सागरी मार्गाने भारतात प्रवेश आणि गोव्यातील मुक्काम
सोनौली पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक कमांडंट प्रिया यादव आणि इतर गुप्तचर यंत्रणांनी जॉर्डन ब्राऊनची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान त्याने भारतात येण्याचा एक थरारक आणि संशयास्पद मार्ग सांगितला. जॉर्डनच्या दाव्यानुसार, तो सुरुवातीला पर्यटन व्हिसावर थायलंडला गेला होता, जिथे त्याचा पासपोर्ट हरवला. त्यानंतर त्याने सागरी मार्गाने श्रीलंका गाठली आणि तिथून पुढे 2 नोव्हेंबर 2025 रोजी तो सागरी मार्गानेच भारतात दाखल झाला. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतात आल्यापासून तो थेट गोव्यात एका दीर्घ मुक्कामासाठी राहिला होता.
तुरुंगात रवानगी आणि चौकशीचे चक्र सुरू
एसएसपी सिद्धार्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अमेरिकन नागरिकाला अटक केल्यानंतर सध्या त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तो सागरी मार्गाने भारतात कसा आला आणि इतके महिने गोव्यात नेमका काय करत होता, याचे गूढ अद्याप कायम आहे. तो खरोखरच अमेरिकेचा माजी कमांडो आहे की एखाद्या मोठ्या कटाचा भाग, याचा शोध घेण्यासाठी देशातील विविध गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या त्याच्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आणि त्याची खरी ओळख पटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर तपास चक्रांना वेग आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.