Shocking! मोबाईल गेमच्या व्यसनापायी 13 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?

मृत मुलाचे वडील अमरसिंग निशाद यांनी आपल्या मुलाला बराच वेळ मोबाईलमध्ये गेम खेळताना पाहिले होते.
Shocking! मोबाईल गेमच्या व्यसनापायी 13 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?

Mobile Game Addiction Child Suicide Surat : गुजरात मधील सुरत शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. मोबाईलवर गेम खेळण्यापासून रोखल्यामुळे आणि गृहपाठ करायला सांगितल्यामुळे एका 13 वर्षांच्या मुलाने गळफास लावून आपले आयुष्य संपवले. सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, लहान मुलांमधील वाढते डिजिटल व्यसन, स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वडिलांनी अभ्यासासाठी ओरडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे वडील अमरसिंग निशाद यांनी आपल्या मुलाला बराच वेळ मोबाईलमध्ये गेम खेळताना पाहिले होते. त्यांनी मुलाला गेम बंद करून शाळेचा अभ्यास पूर्ण करण्यास सांगितले. मात्र, मुलाने वडिलांच्या सांगण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. यावरून वडिलांनी त्याला थोडे ओरडल्यानंतर मुलाने फोन आईकडे सुपूर्द केला आणि दुसऱ्या खोलीत जाऊन आतून कडी लावून घेतली.

हेही वाचा – Nesco Drug Case : नेस्को ड्रग प्रकरणाचा अमेरिकेशी संबंध? 20 जणांचा '9X9' व्हॉट्सॲप ग्रुप, सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष…; धक्कादायक खुलास्याने खळबळ

जेवणासाठी हाक मारली अन् उघडकीस आला भयंकर प्रकार
काही वेळानंतर रात्रीच्या जेवणाच्या वेळी वडिलांनी मुलाला बाहेर येण्यासाठी आवाज दिला. परंतु, आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला असता, मुलाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ न्यू सिव्हिल रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मूळचे ओडिशातील असलेले हे कुटुंब गेल्या 10 वर्षांपासून सुरतमध्ये वास्तव्यास असून अमरसिंग हे पॉवरलूम कारखान्यात काम करतात.

शाळेतून तक्रारी अन् पोलिस चौकशीत मोबाईलचे व्यसन लागल्याचे समोर
चौक बाजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युतिका कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा विड रोड परिसरातील सुरत महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता 7 वी मध्ये शिकत होता. तो दांपत्याचा एकुलता एक मुलगा होता. मुलगा नियमित गृहपाठ करत नसल्याच्या तक्रारी शाळेकडून पालकांना आधीच मिळाल्या होत्या. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मुलाला मोबाईल गेमिंगचे तीव्र व्यसन जडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – Beed Crime : बळजबरीने विवाह, विरोध केला तर मारहाण…, पैशांसाठी वडील, सावत्र आईने अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version