Digital Arrest Scam : सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला चक्क 6 महिने ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले; 32 कोटींची फसवणूक झाली कशी?

या फसवणुकीची सुरुवात एका फोन कॉलने झाली. या महिलेला सतत धमकावण्यात आले. घाबरलेली महिला सर्व काही या भामट्यांच्या सांगण्यानुसार करत गेली. अखेर जवळपास 32 कोटी गमावल्यावर तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
Digital Arrest Scam : सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला चक्क 6 महिने ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले; 32 कोटींची फसवणूक झाली कशी?

Digital Arrest Fraud Case :  बंगळुरू येथे 57 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची 'डिजिटल अरेस्ट' करून तब्बल 32 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआय (CBI) अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांनी या महिलेला 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ सतत व्हिडिओ चालू ठेवण्यास भाग पाडून देखरेखीखाली ठेवले. या काळात घाबरलेल्या महिलेने तब्बल 187 वेळा बँकेतून पैसे ट्रान्सफर केले. हे सर्व घडवून आणणाऱ्या भामट्यांनी सप्टेंबर 2024 मध्ये या प्रकाराची सुरुवात केली आणि अनेक महिन्यांनंतर जेव्हा संपर्क तुटला, तेव्हा जून 2025 मध्ये महिलेने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या फसवणुकीची सुरुवात एका फोन कॉलने झाली. डीएचएल कंपनीचा एक्झिक्युटिव्ह असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने महिलेला सांगितले की, तिच्या नावावर असलेल्या एका पार्सलमध्ये तीन क्रेडिट कार्ड्स, चार पासपोर्ट आणि बंदी असलेले एमडीएमए नावाचे ड्रग्ज सापडले आहेत आणि ते पार्सल मुंबईतील अंधेरी केंद्रावर आले आहे. महिलेने आपला पार्सलशी काही संबंध नसल्याचे सांगितल्यावर, फोन करणाऱ्याने तिचा फोन नंबर या पार्सलशी जोडलेला असून हे सायबर गुन्ह्याचे प्रकरण असल्याचे सांगितले. त्यानंतर, फोन कॉल सीबीआय अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्यात आला, ज्याने सर्व पुरावे महिलेच्या विरोधात असल्याचे सांगून तिला मानसिक दबाव आणला. फसवणूक करणाऱ्यांनी तिला पोलिसांशी संपर्क साधू नका, असे बजावले. कारण, गुन्हेगार तिच्या घरावर पाळत ठेवून आहेत, अशी भीतीही दाखवली.

हेही वाचा – Chhatrapati Sambhaji Nagar : पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ! बँक कर्मचाऱ्याला लुटणारी टोळी 24 तासांत जेरबंद

घाबरल्यामुळे भामट्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही केले
कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलाचे लग्न होणार असल्यामुळे घाबरलेल्या महिलेने त्यांच्या सर्व सूचनांचे पालन केले. फसवणूक करणाऱ्यांनी तिला दोन स्काइप आयडी (Skype ID) इन्स्टॉल करण्यास सांगितले आणि मे 2025 मध्ये प्लॅटफॉर्म बंद होईपर्यंत तिला कायम व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडले. 'मोहित हांडा', 'राहुल यादव' आणि वरिष्ठ सीबीआय अधिकारी 'प्रदीप सिंह' अशा नावांनी वेगवेगळ्या व्यक्तींनी तिच्यावर लक्ष ठेवले आणि तिला निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी पैशांची मागणी केली. गेल्या वर्षी 24 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर यादरम्यान महिलेने तिच्या आर्थिक व्यवहारांची माहिती उघड केली आणि मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले. त्यानंतर 24 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या काळात 'श्युरिटी अमाऊंट' म्हणून दोन कोटी रुपये, आणि नंतर 'कर' म्हणून आणखी रक्कम भरली. फसवणूक करणाऱ्यांच्या सूचनांचे पालन करत महिलेने तिचे फिक्स्ड डिपॉझिट मोडले आणि इतर बचत मिळून एकूण 187 व्यवहारांमध्ये 31.83 कोटी रुपये हस्तांतरित केले.

बनावट कागदपत्रांचा वापर आणि पैसे परत करण्याचे आश्वासन
फेब्रुवारी 2025 पर्यंत व्हेरिफिकेशन (Verification) झाल्यानंतर पैसे परत केले जातील, असे त्या महिलेला वारंवार आश्वासन देण्यात आले होते. तसेच, तिच्या मुलाच्या डिसेंबरमधील साखरपुड्यापूर्वी 'क्लिअरन्स लेटर' देण्याचे वचनही दिले होते आणि त्यासाठी बनावट कागदपत्रेही पाठवली होती. फेब्रुवारीनंतर फसवणूक करणारे सतत 'प्रोसेसिंग चार्जेस' मागत राहिले आणि पैसे परत करण्याची वेळ मार्चपर्यंत पुढे ढकलली. काही दिवसांनंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला. सतत देखरेखीखाली आणि तणावामुळे महिलेची मानसिक आणि शारीरिक स्थिती बिघडली आहे. अखेरीस, मुलाचे जूनमधील लग्न झाल्यावर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – Delhi Blast Case: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई; मास्टरमाईंड आमिर राशिद अली 10 दिवस NIA कस्टडीमध्ये

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version