भारतीय वंशाच्या 38 वर्षीय शालिनी ठाकूर या महिलेची कॅलिफोर्नियाची राजधानी सेक्रामेंटो इथे अमानुषरीत्या हत्या करण्यात आली. तिच्या संरक्षणाचा आदेश कोर्टाने दिला असतानाच आरोपी रोहित गेल्या वर्षभरापासून शालिनीचा पाठलाग करत होता. फरार झालेल्या या आरोपीला पोलिसांनी घेरताच त्याने स्वतःचे जीवन संपवले.
सेक्रामेंटोच्या आर्डेन आर्केड परिसरात पानेरा ब्रेडच्या आउटलेटबाहेर ही धक्कादायक घटना घडली. शालिनी रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच बाहेर वाट पाहत असलेल्या रोहितने तिचा पाठलाग सुरू केला. बंदूक रोखल्यानंतर शालिनी पळू लागली, मात्र रोहितने तिच्यावर गोळीबार केला. गोळीबारात जखमी होऊन शालिनी जमिनीवर पडली. त्यानंतर रोहितने जवळ जाऊन तिच्यावर पुन्हा गोळीबार केला. या घटनेत शालिनीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर फरार झालेल्या रोहितचा पोलिसांनी पाठलाग करून महामार्गावर त्याची गाडी घेरली. पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे लक्षात येताच रोहितने गाडीतच स्वतःवर गोळी झाडून घेतली.
शालिनीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, रोहित गेल्या वर्षभरापासून शालिनीचा छळ करत होता. रोहितला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, दोघांच्या वयात 16 वर्षांचे अंतर असल्याने शालिनीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे रोहित तिच्यावर नाराज होता. घटनेच्या दिवशी दुपारी दोन वाजता शालिनीचे तिच्या आईसोबत फोनवरून बोलणे झाले होते. त्यानंतर आईने तिला व्हॉट्सअॅपवरही मेसेज केले होते.
रोहितने सप्टेंबर 2025 पासून शालिनीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. शालिनीची एका डिलिव्हरी अॅपच्या कामानिमित्त रोहितशी ओळख झाली होती. त्यानंतर रोहितने तिच्याशी लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तो अनेक तास शालिनीच्या घराबाहेर उभा राहत असे. तसेच, त्याने शालिनीच्या कारमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवला होता आणि तिच्या फ्लॅटची बनावट चावीही तयार करून घेतली होती.
रोहितच्या त्रासाला कंटाळून शालिनीने त्याच्याविरोधात न्यायालयातून संरक्षण आदेश मिळवला होता. मात्र, या आदेशाचेही रोहितने उल्लंघन केल्याचे समोर आले होते.