रेल्वे प्रवास कितीही सुखकर वाटत असला तरी, प्रवासादरम्यान थोडीशी जरी हलगर्जी झाली तरी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशहून बिहारकडे जाणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या कुशीत झोपलेले नऊ महिन्यांचे बाळ निसटून आपत्कालीन खिडकीतून थेट खाली पडले. तब्बल 23 तासांच्या शोधमोहिमेनंतर बाळाचा मृतदेह झुडपात पडल्याचे तपासात समोर आले आहे.
नेमके काय घडले?
दिल्लीतील सीतापुरी परिसरात राहणारे मोहन कुमार हे पत्नी काजल आणि नऊ महिन्यांच्या बाळासोबत बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील सालौना गावी जाण्यासाठी निघाले होते. हे कुटुंब आनंद विहार स्थानकावरून सीमांचल एक्स्प्रेसच्या S-1 डब्यातून प्रवास करत होते. त्यांना 61 आणि 64 क्रमांकाचे बर्थ मिळाले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन शौचालयात गेले असताना काजल बाळाला दूध पाजत होती. त्याचवेळी तिला डोळा लागला आणि तिच्या कुशीत असलेले बाळ मागे सरकून आपत्कालीन खिडकीतून थेट बाहेर पडले. मोहन परत आल्यावर बाळ दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोघांनीही संपूर्ण डब्यात शोध घेतला, मात्र बाळाचा कुठेच शोध लागला नाही. बाळ धावत्या रेल्वेतून खाली पडले असावे, अशी शंका आल्यानंतर मोहन यांनी आपत्कालीन साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही सहप्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले.
प्रयागराज येथे पोहोचल्यानंतर या दाम्पत्याने GRP ला घटनेची माहिती दिली. त्यानंतर GRP आणि RPF च्या पथकाने रेल्वे रुळालगत शोधमोहीम सुरू केली. रात्रभर शोध घेतल्यानंतर शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास फैजुल्लाहपूर स्थानकाजवळील झुडपात बाळाचा मृतदेह आढळून आला. दाट झाडी आणि पाणी साचल्यामुळे शोधमोहीमेत अडथळे आल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. मृतदेह सापडल्यानंतर शवविच्छेदनास विलंब झाल्याने आई-वडिलांना रात्रभर स्थानकावरच थांबावे लागले. या संपूर्ण प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत नाराजी व्यक्त केली आहे.