RE-NEET Exam Paper Leak Scam : गुजरातच्या अहमदाबाद सायबर क्राईम ब्रांचने (Ahmedabad Crime Branch) वैद्यकीय प्रवेशासाठीच्या RE-NEET परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा खोटा दावा करून विद्यार्थी आणि पालकांना लुटणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. टेलिग्राम चॅनेल्सचा वापर करून प्रश्नपत्रिका देण्याच्या बहाण्याने ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी राजस्थानमधील जयपूर आणि कोटा येथून अटक केली आहे. संयुक्त पोलीस आयुक्त (क्राइम) शरद सिंघल यांनी या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती देताना स्पष्ट केले की, RE-NEET परीक्षेचा कोणताही पेपर प्रत्यक्षात लीक झालेला नव्हता. हे आरोपी केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार करून लाखो रुपयांची फसवणूक करत होते.
टेलिग्रामवर बनावट चॅनेल्सचा सुळसुळाट; 80 लाखांची उलाढाल
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी राजस्थानच्या जयपूरचा रहिवासी सुमेर सिंह भरतलाल मीणा आणि कोटाचा रहिवासी आकाश पप्पूलाल मीणा अशी आहेत. हे दोन्ही आरोपी टेलिग्रामवर 'Raghav Singh NEET' या मुख्य आयडीसह सुमारे 8 वेगवेगळ्या चॅनेल्सचे संचालन करत होते. आपल्या या चॅनेल्सची विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्यांनी प्रीमियम आणि सामान्य सदस्यांची संख्या कृत्रिमरीत्या वाढवली होती, जेणेकरून लोकांचा त्यांच्यावर सहज विश्वास बसेल. केवळ परीक्षेची फसवणूकच नव्हे, तर 'Trade With Karol' आणि 'Pankaj Bhardwaj' सारख्या चॅनेल्सच्या माध्यमातून त्यांनी लोकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवूनही फसवले आहे. पोलिसांना आरोपींच्या 6 बँक खात्यांच्या तपासात देशातील विविध राज्यांमधून नोंदवलेल्या 12 तक्रारी आढळल्या आहेत, तसेच गेल्या 1 वर्षात त्यांच्या खात्यांमधून तब्बल 80 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत.
70 हून अधिक जणांना लावला चुना; गेमिंग वेबसाईटचा वापर
गेल्या अवघ्या 1 महिन्यात या सायबर ठगांनी जवळपास 250 मोबाईल नंबर आणि विविध टेलिग्राम चॅनेल्सच्या साहाय्याने हजारो लोकांशी संपर्क साधला होता. प्राथमिक तपासात आतापर्यंत 70 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फसवणुकीतून मिळालेला हा पैसा लपवण्यासाठी आरोपी गेमिंग वेबासाईट आणि वेगवेगळ्या बँक खात्यांचा हुशारीने वापर करत असत. बेकायदेशीरपणे जमा झालेली रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून ती रोख स्वरूपात काढली जात असे.
आरोपींकडे कोणताही पेपर नाही; पोलिसांचा पुढील तपास सुरू
सायबर क्राईम ब्रांचला पकडण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून NEET किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अथवा अभ्यास साहित्य मिळालेले नाही. यावरून हे स्पष्ट होते की, हे संपूर्ण नेटवर्क केवळ खोटे दावे आणि ऑनलाईन जाहिरातींच्या बळावर सामान्य जनतेला लुटण्यासाठी चालवले जात होते. परीक्षेचे भ्रामक संदेश आणि जाहिराती पसरवून विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढणाऱ्या या दोन्ही आरोपींची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात सामील असलेल्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा आणि आर्थिक व्यवहारांच्या संपूर्ण जाळ्याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा – NEET UG Scam: मोठी बातमी! NEET सह विविध परीक्षांच्या बनावट प्रश्नपत्रिकांची विक्री; 4 आरोपी गजाआड
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.