Rajkot Farmer Cyber Fraud 2026 : सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या एका मोठ्या सायबर फ्रॉडचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकवरील एका फ्रेंड रिक्वेस्टच्या जाळ्यात अडकून गुजरातच्या राजकोटमधील एका शेतकऱ्याला तब्बल 6.31 लाख रुपयांचा गंडा बसला आहे. याप्रकरणी राजकोट सायबर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून तीन आफ्रिकन नागरिकांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये घानाची जोसेफिन उर्फ एंजेल, टांझानियाचा म्गेन्जेली इमानी डेनिस आणि दक्षिण सुदानचा फिलिप बॅटिस्टा जोसेफ व्हॅलेंटाईन यांचा समावेश आहे.
जर्मनीहून सोन्याची साखळी, आयफोन अन् 30 हजार युरो पाठवल्याचे आमिष
या फसवणुकीची सुरुवात फेसबुकवरून आलेल्या एका फ्रेंड रिक्वेस्टने झाली होती. स्वतःला 'सिंगल मदर' सांगणाऱ्या घानाच्या जोसेफिनने शेतकऱ्याशी संपर्क वाढवून विश्वासाचे नाते निर्माण केले. काही दिवसांनंतर तिने शेतकरी आणि त्याच्या कुटुंबासाठी जर्मनीहून एक महागडे पार्सल पाठवल्याचा दावा केला. या पार्सलमध्ये 30 हजार युरो रोख रक्कम, सोन्याची साखळी, लॅपटॉप, महागडे घड्याळ आणि आयफोन असल्याचे सांगून तिने शेतकऱ्याला आमिष दाखवले होते.
हेही वाचा – फ्री Wi-Fiचा मोह महागात! CSMT स्थानकावर धक्कादायक घटना; काही मिनिटांत खात्यातून लाखोंची रक्कम गायब
बनावट कस्टम अधिकारी बनून 6.31 लाख ऑनलाईन उकळले
पार्सल भारतात पोहोचल्यानंतर दिल्ली विमानतळावरून एका बनावट सीमाशुल्क (कस्टम) अधिकाऱ्याचा शेतकऱ्याला फोन आला. पार्सल क्लिअरन्स, कस्टम ड्युटी आणि फॉरेन करन्सी कन्व्हर्जनच्या नावाखाली आरोपींनी शेतकऱ्याकडून टप्प्याटप्प्याने पैसे उकळण्यास सुरुवात केली. आरोपींच्या भुलथापांना बळी पडत शेतकऱ्याने आपल्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांतून एकूण 6.31 लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, तरीही पार्सल न मिळाल्याने आणि पुन्हा पैशांची मागणी सुरूच राहिल्याने फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले.
मुदत संपलेले व्हिसा अन् 15 संशयित बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया
शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी व्हॉट्सॲप चॅट, आयपी लॉग्स आणि बँक व्यवहारांची पडताळणी करत आरोपींचा शोध लावला. तपासात आरोपींचे व्हिसा संपले असूनही ते बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याचे आणि यापूर्वीच्या कोर्ट केसेसमुळे भारतातच अडकून गुन्हे करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली 15 बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली असून या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा – International Cyber Fraud : मुंबई पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड रॅकेट उघड; गोव्यातून 12 जणांना अटक
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.