Vigilance Dept. Raid : भ्रष्ट अधिकाऱ्याचा बेहिशोबी कारभार; वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक ते करोडपती तहसीलदार होण्यापर्यंत मजल

कटक जिल्ह्यातील बारंग येथील अतिरिक्त तहसीलदारांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Vigilance Dept. Raid : भ्रष्ट अधिकाऱ्याचा बेहिशोबी कारभार; वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक ते करोडपती तहसीलदार होण्यापर्यंत मजल

Odisha Vigilance Dept Raid : ओडिशातील एका महसूल अधिकाऱ्याकडे उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा कितीतरी पटीने अधिक मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (Odisha Vigilance department – ओडिशा व्हिजिलन्स) या अधिकाऱ्याच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर छापे टाकले असता, त्यांच्याकडे चक्क 75 लाख रुपयांची रोकड आणि कोट्यवधींची स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले.

व्हिजिलन्स विभागाची मोठी कारवाई
कटक जिल्ह्यातील बारंग येथील अतिरिक्त तहसीलदारांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत दक्षता विभागाने मंगळवारी सकाळी त्यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर छापे टाकले. या कारवाईत भुवनेश्वरमधील दोन तीन-मजली इमारती, एक फ्लॅट आणि खुर्दा येथील एक दुमजली इमारत अशी एकूण चार घरे जप्त करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, 4 अत्यंत महागडे भूखंड (Plots) देखील अधिकाऱ्याच्या ताब्यात असल्याचे आढळले आहे.

रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने
छाप्यादरम्यान व्हिजिलन्स अधिकाऱ्यांच्या हाती केवळ मालमत्तेची कागदपत्रेच लागली नाहीत, तर मोठ्या प्रमाणात रोकडही सापडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 75 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 100 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक आलिशान कार जप्त केली आहे. सध्या या मालमत्तांचे मूल्यमापन करण्याचे काम सुरू असून शोधमोहीम अद्याप संपलेली नाही.

हेही वाचा – SIM Box Scam Alert: सावधान! तुमच्या स्क्रीनवर दिसणारा +91 नंबर असू शकतो ‘बोगस’; मिनिटांत बँक खाते रिकामे करणारा ‘सिमबॉक्स’ स्कॅम

2,000 रुपयांच्या पगारापासून सुरुवात
या महसूल अधिकाऱ्याचा सरकारी सेवेतील प्रवास थक्क करणारा आहे. 1995 मध्ये या अधिकाऱ्याने कटक येथील पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयात ‘वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक’ म्हणून नोकरीची सुरुवात केली होती. अनुकंपा तत्त्वावर (Rehabilitation Scheme) मिळालेल्या या नोकरीत त्यांचा सुरुवातीचा मासिक पगार केवळ 2,000 रुपये इतका होता. अवघ्या काही वर्षांत त्यांनी जमवलेली ही अफाट मालमत्ता आता तपासाच्या फेऱ्यात अडकली आहे.

इतर ठिकाणीही छापे
केवळ तहसीलदारांवरच नाही, तर भ्रष्टाचारविरोधी पथकाने केओन्झार (Keonjhar) जिल्ह्यातील एका पंचायत विस्तार अधिकाऱ्याच्या (PEO) मालमत्तांवरही एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. ओडिशात सरकारी अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचारावर व्हिजिलन्स विभागाने हा मोठा बडगा उगारला आहे.

हेही वाचा – Crime News: हनीमून अर्ध्यात सोडला… पत्नीने आयुष्य संपवलं; असह्य त्रासामुळे पती आणि सासूनेही आयुष्याचा केला शेवट; कारण वाचून बसेल धक्का

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version