NEET Paper Leak" देशभरात चर्चेत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी शिक्षिका मनीषा मांढरे हिला न्यायालयाने 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली असून तिच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे, पेपरफुटीच्या या संपूर्ण प्रकरणात कोणताही डिजिटल किंवा लिखित पुरावा न सापडल्याने सीबीआयसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, मनीषा मांढरे यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने प्रश्नपत्रिकेतील माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा संशय आहे. गेली अनेक वर्षे एकाच विषयाचे अध्यापन केल्यामुळे त्यांची त्या विषयावर मजबूत पकड होती. याच अनुभवाचा वापर करून त्यांनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न थेट स्मरणशक्तीत साठवून ठेवले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितल्याचा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.
या प्रकरणातील सर्वात मोठी अडचण म्हणजे कोणतीही चॅट, मेसेज, कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे सीबीआयला आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तपास अधिकाऱ्यांनाही या पद्धतीने पेपरफुटी झाल्याच्या शक्यतेने धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा दुसरी आरोपी मनीषा वाघमारे हिच्या चौकशीनंतर झाल्याची माहिती समोर आली आहे. वाघमारेने चौकशीदरम्यान मनीषा मांढरे यांचे नाव घेतल्यानंतर सीबीआयने त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर मांढरे यांना ताब्यात घेण्यात आले आणि सखोल चौकशी सुरू करण्यात आली.
सीबीआयचे विशेष पथक सध्या मांढरे यांच्या घराची, संगणकांची, मोबाईल आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी करत आहे. तसेच कोणतेही लिखित साहित्य किंवा संभाव्य पुरावे नष्ट करण्यात आले आहेत का, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणात थेट पुरावे कमी असल्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.
या घडामोडींनंतर शिक्षण क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध मॉडर्न महाविद्यालय प्रशासनाने तातडीची बैठक घेत मनीषा मांढरे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे नाव समोर आल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.
देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेशी संबंधित हे प्रकरण असल्यामुळे सीबीआयकडून तपास अधिक वेगाने सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात असून आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.