Mumbai Crime: धावत्या लोकलमधून दिव्यांग प्रवाशाला ढकललं; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपीच्या कबुलीने पोलिसही चक्रावले

वांद्रे-माहिमदरम्यान धावत्या लोकलमधून प्रवाशाला धक्का दिल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी ताब्यात असून, कावळ्यामुळे धक्का लागल्याचा दावा त्याने केला आहे.

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून दिव्यांग प्रवाशाला ढकललं; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपीच्या कबुलीने पोलिसही चक्रावले

मुंबई: मुंबईच्या लोकलमधील प्रवासादरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. वांद्रे आणि माहिम रेल्वे स्थानकांदरम्यान चर्चगेटहून बोरीवलीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये एका प्रवाशाला धक्का देऊन खाली पाडल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

वांद्रे-माहिमदरम्यान नेमकं काय घडलं?

20 ऑगस्ट रोजी दुपारी चर्चगेटहून बोरीवलीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ट्रेन वांद्रे स्थानकाजवळ पोहोचत असताना काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. वांद्रे खाडीच्या परिसरात एक व्यक्ती गंभीर अवस्थेत पडल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी तातडीने जखमी प्रवाशाला भाभा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख कॅझेटन डेनिस पेरिस अशी करण्यात आली आहे.

बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, लोकलच्या डब्यात बसण्याच्या जागेवरून दोघांमध्ये वाद झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी अमजद सफरुद्दीन शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मृत व्यक्ती दिव्यांग असल्याची माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी प्लंबिंगचे काम करताना झालेल्या अपघातात त्यांचा एक पाय गमावला होता. ते पूर्वी सांताक्रूझ परिसरात राहत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीचा धक्कादायक दावा; ‘कावळ्यामुळे’ झाला प्रकार?

चौकशीदरम्यान अमजदने पोलिसांसमोर वेगळाच दावा केल्याचे समोर आले आहे. लोकलच्या डब्यात कावळा शिरला होता. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना संबंधित प्रवाशाला धक्का लागला आणि तो खाली पडला, असे अमजदने सांगितल्याची माहिती आहे.

मात्र, पोलिसांनी या दाव्यावर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. प्रत्यक्षात कावळ्यामुळे हा अपघात झाला की प्रवाशांमध्ये झालेल्या वादातून जाणीवपूर्वक धक्का देण्यात आला, याचा तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे जबाब, घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे.

रेल्वे पोलिसांकडून तपासाला वेग

या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वांद्रे रेल्वे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशाचा मृत्यू नेमका अपघातामुळे झाला की धक्क्यामुळे, हे स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number