पुणे : पुण्याच्या इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल (आण्णा) पवार यांच्यावर आज, गुरुवारी नगरपरिषद कार्यालयाबाहेर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल पवार नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धाव घेत चॉपर आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डाव्या हातावर वार झाला असून प्रसंगावधान राखल्यामुळे ते थोडक्यात बचावले. त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले वसीम शेख हेही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे इंदापुरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. हल्लेखोर कोण होते, हल्ल्या मागील नेमके कारण काय, याचा तपास इंदापूर पोलीस करत आहेत. दरम्यान, नगरसेवक अनिल पवार यांनीही हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.