HIV Injection Case Woman Suicide : हैदराबादमधून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे स्थळ नाकारल्याचा राग मनात धरून एका माथेफिरूने एका 24 वर्षीय तरुणीला चक्क एचआयव्ही (HIV) पॉझिटिव्ह रक्ताचे इंजेक्शन टोचले. या अघोरी कृत्यामुळे पीडित तरुणीला बसलेला मानसिक धक्का इतका भीषण होता की, अखेर तिने मृत्यूला कवटाळले. ही घटना 11 मार्च रोजी घडली होती, ज्यानंतर सुमारे महिनाभर मानसिक आघाताशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी, 10 एप्रिल रोजी या तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
नेमकी घटना आणि लग्नाचा नकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोहर आणि मृत तरुणी हे एकमेकांचे नातेवाईक होते. त्यांचे लग्न कुटुंबाकडून ठरवण्यात आले होते. मात्र, मनोहरच्या आई-वडिलांना आधीच एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून सप्टेंबर 2025 मध्ये मनोहरची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये तो स्वतःदेखील पॉझिटिव्ह आढळला. हा धक्कादायक अहवाल समोर येताच तरुणीने त्याच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. हाच राग मनात धरून मनोहरने सूड घेण्याच्या उद्देशाने तिला बाधित रक्ताचे इंजेक्शन टोचले.
सामाजिक कलंक आणि टोकाचा निर्णय
या घटनेनंतर पोलिसांनी मनोहरला तात्काळ अटक केली होती. मात्र, त्या दिवसापासून पीडित महिला प्रचंड मानसिक तणावाखाली होती. समाजात वावरताना वाटणारी भीती आणि 'सामाजिक कलंक' लागल्याची भावना तिला आतून पोखरत होती. या भावनिक आघाताशी ती सतत संघर्ष करत होती. अखेर शुक्रवारी तिने राहत्या घरी गळफास घेतला. तिच्या पालकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोचारम आयटी कॉरिडॉरचे पोलीस या प्रकरणाचा आता अधिक सखोल तपास करत आहेत.
सूडाचे भयंकर प्रकार वाढले?
अशाच प्रकारची दुसरी एक भयानक घटना जानेवारी 2026 मध्ये आंध्र प्रदेशातील कुर्नूल शहरात घडली होती. तिथे वसुंधरा नावाच्या एका महिलेने तिच्या माजी प्रियकराच्या पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने एचआयव्हीचे इंजेक्शन दिले होते. प्रेमसंबंध तुटल्याचा राग आणि प्रियकराच्या पत्नीबद्दलचा मत्सर यातून हा सूड उगवण्यात आला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे समाजात अशा भयंकर प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.