Crime News : माती भरलेल्या डंपरने चिरडलं; रस्त्यावर 50 मीटर फरफटवलं; बेकायदेशीर उत्खनन रोखणाऱ्या वन अधिकाऱ्याचा धक्कादायक शेवट

वनक्षेत्रात चालणारे बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या एका धाडसी 'रेंज ऑफिसर'ला (RFO) माफियांच्या माती भरलेल्या भरधाव डंपरने चिरडले.

Crime News : माती भरलेल्या डंपरने चिरडलं; रस्त्यावर 50 मीटर फरफटवलं; बेकायदेशीर उत्खनन रोखणाऱ्या वन अधिकाऱ्याचा धक्कादायक शेवट
बेकायदेशीर उत्खनन रोखणाऱ्या वन अधिकाऱ्याचा धक्कादायक शेवट

Crime News: राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील छोटी सादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि भीषण घटना समोर आली आहे. वनक्षेत्रात चालणारे बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या एका धाडसी ‘रेंज ऑफिसर’ला (RFO) माफियांच्या माती भरलेल्या भरधाव डंपरने चिरडले. या हल्ल्यात अधिकारी आपल्या ‘बुलेट’ मोटारसायकलसह तब्बल 50 मीटरपर्यंत फरफटत गेले. या गंभीर अपघातात वन अधिकारी प्रताप सिंह चुंडावत यांचा निंबाहेडा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर उत्खननावर कारवाईचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11:30 च्या सुमारास ‘श्री घाटीवाले बालाजी’ मंदिरालगतच्या सरकारी वनक्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेंज ऑफिसर प्रताप सिंह चुंडावत आणि एक वनपाल (फॉरेस्टर) तातडीने कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांना मातीने भरलेला एक भरधाव डंपर बाहेर पडताना दिसला. रेंज ऑफिसर चुंडावत यांनी आपले वाहन पुढे करून डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता थेट त्यांच्या बुलेट मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

50 मीटर फरफटत नेलं

डंपर चालकाने निर्दयपणे रेंज ऑफिसरला त्यांच्या बुलेटसह सुमारे 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. या भीषण धडकेत बुलेटचा चक्काचूर झाला आणि अधिकारी गंभीररीत्या जखमी झाले. घटनेनंतर डंपर आणि जेसीबीचे चालक आपली वाहने घेऊन पळून गेले. पळून जाताना डंपर चालकाने ‘घाटीवाले बालाजी’ मंदिराच्या पुढे रस्त्यावरच माती खाली उतरवून अडथळा निर्माण केला आणि भंवरमाता रस्त्यावरून गोमानाकडे पळ काढला. सोबत असलेल्या वनपालाने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली, ज्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – Crime News: माथेफिरू व्यक्तीचा भयानक क्रूरपणा; पत्नी, मुलगा अन् 2 पुजाऱ्यांना संपवलं, पोलिसांच्या चकमकीत आरोपीचा मृत्यू

उपचारादरम्यान मृत्यू; पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू

रेंज ऑफिसर चुंडावत यांना तातडीने छोटी सादरी येथील जयचंद मोहिल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार दिल्यानंतर त्यांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना निंबाहेडा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळाची पाहणी केली असून बेकायदेशीर उत्खनन करणारे आणि पसार झालेले चालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची विविध पथके फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सातारा येथेही वाळूची बेकायदेशीर वाहतूक रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला डंपरने 1 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे आता बेकायदेशीर उत्खनन आणि माफियांच्या वाढत्या गुंडगिरीवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number