Faridabad Youth Suicide after Instagram Video Post : हरियाणातील फरीदाबाद येथे रविवारी एका कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने आपल्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी या तरुणाने इन्स्टाग्रामवर एक वेदनादायी व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने आपली पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांवर असह्य मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओतील आरोपांची कसून चौकशी केली जात आहे.
लग्नानंतर 2 वर्षांतच संसाराचा करुण अंत
मृत राहुलच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2 वर्षांपूर्वी राहुलने ज्योती नावाच्या महिलेशी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्यात वाद सुरू झाले, कारण त्याच्या पत्नीला राहुलने स्वतःच्या आई-वडिलांसोबत राहिलेले अजिबात मान्य नव्हते. याच वादामुळे तो कुटुंबापासून वेगळा राहू लागला होता आणि सुमारे 4 महिन्यांपूर्वीच त्याने आपले नवीन कपड्यांचे दुकान सुरू केले होते. रविवारी सकाळी दुकानात जाण्यापूर्वी राहुल नेहमीप्रमाणे आपल्या आईला घरी भेटला होता, मात्र त्यानंतर काही वेळातच त्याने दुकानात जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले.
हेही वाचा – Crime News: 50 जणांवर अत्याचार, एचआयव्हीग्रस्त व्यक्तीचे काळे कृत्य; आरोपीच्या कबुलीजबाबाने पोलिसही हादरले
'झाडू मारतो, भांडी घासतो तरीही छळ', व्हिडिओमधील धक्कादायक दावे
राहुलने मृत्यूपूर्वी पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये आपली पत्नी ज्योती, सासू वीणा, सासरे बिट्टू आणि मेव्हणी नीतू यांच्या त्रासाचा पाढा वाचला आहे. "घरामध्ये झाडू मारणे आणि भांडी घासण्यासह मी सगळी कामे करायचो, तरीही मला मारहाण केली जायची आणि माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले," असा खळबळजनक दावा राहुलने यात केला आहे. या सततच्या त्रासामुळे आपण प्रचंड मानसिक तणावाखाली जगत असल्याचे सांगत त्याने आपल्या मृत्यूला सासरची मंडळीच जबाबदार असून त्यांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच, त्याच्या मृत्यूनंतर त्याची सर्व मालमत्ता आई, बहीण आणि भावांना मिळावी, असेही त्याने व्हिडिओत स्पष्ट नमूद केले आहे.
छळामुळे वाढला होता तणाव; पोलिसांकडून तपास सुरू
राहुलचे नातेवाईक अमित यांनी आरोप केला आहे की, पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे आणि आई-वडिलांना भेटू देण्यास घातलेल्या बंदीमुळे राहुल प्रचंड दबावाखाली होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस तपास अधिकारी संजय कुमार यांनी सांगितले की, राहुलचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी फेसबुक-इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ अधिकृत तपासाचा एक मुख्य भाग बनवण्यात आला असून, चौकशीदरम्यान त्यातील प्रत्येक आरोपाची कायदेशीर पडताळणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.