Disha Salian Case: सहा वर्षांनंतर दिशा सालियन केसला नवं वळण; हाथरस ते आरजी कर तपास गाजवणाऱ्या ‘गोल्ड मेडलिस्ट’ सीमा पाहुजांकडे तपासाची धुरा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून CBIच्या स्पेशल क्राईम युनिटच्या एसपी सीमा पाहुजा यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. नव्या FIRनंतर तपास वेगाने पुढे जाणार आहे.

Disha Salian Case:  सहा वर्षांनंतर दिशा सालियन केसला नवं वळण; हाथरस ते आरजी कर तपास गाजवणाऱ्या ‘गोल्ड मेडलिस्ट’ सीमा पाहुजांकडे तपासाची धुरा

मुंबईतील दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात CBIने नव्याने FIR दाखल केल्यानंतर तपासाची जबाबदारी स्पेशल क्राईम युनिटच्या एसपी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील प्रकरणांच्या तपासातील अनुभवामुळे या नियुक्तीकडे विशेष लक्ष लागले आहे. 

दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर हे प्रकरण अनेक वर्षे चर्चेत राहिले. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर CBIने औपचारिक FIR दाखल केल्यानंतर तपासाला नवी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे. 

कोण आहेत सीमा पाहुजा?

सीमा पाहुजा या सध्या नवी दिल्लीतील CBI मुख्यालयाच्या स्पेशल क्राईम युनिटमध्ये पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत आहेत. डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक विश्लेषण आणि क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासातील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना 2021 मध्ये 'बेस्ट इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर'चा गोल्ड मेडल मिळाला होता. 

याआधी त्यांनी हाथरस प्रकरण, उन्नाव बलात्कार प्रकरण, हिमाचलमधील 'गुडिया' केस तसेच कोलकात्यातील आरजी कर रुग्णालयाशी संबंधित बहुचर्चित प्रकरणांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे दिशा सालियन प्रकरणातील तपासासाठी त्यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

CBIचा तपास नेमका कशावर?

CBIच्या तपासात 8 जून 2020 च्या रात्रीच्या घटनाक्रमाचा पुन्हा सखोल आढावा घेतला जाणार आहे. त्या दिवशी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाब नव्याने नोंदवणे, कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR), डिजिटल डेटा, फॉरेन्सिक पुरावे आणि आधीच्या तपासातील नोंदींची पडताळणी केली जाणार आहे. 

याशिवाय मुंबई पोलिसांच्या आधीच्या तपासातील कागदपत्रे, पोस्टमॉर्टेम अहवाल आणि इतर पुराव्यांचे पुनर्मूल्यांकनही CBIकडून केले जाणार असल्याचे वृत्त आहे. 

FIRनंतर वाढलेले लक्ष

CBIने 13 सप्टेंबर रोजी या प्रकरणात FIR नोंदवला. वृत्तांनुसार, FIRमध्ये अनेक व्यक्तींच्या नावांचा उल्लेख आहे; मात्र सध्या CBIने कोणत्याही व्यक्तीला अधिकृतपणे नामनिर्देशित आरोपी म्हणून घोषित केलेले नाही. पुढील कारवाई तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांवर अवलंबून असेल. 

या घडामोडींमुळे दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, CBIच्या पुढील तपासाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number