Cook Pushed Child in Tandoor : एका लग्नसमारंभात आचाऱ्याने 11 वर्षांच्या मुलावर निर्दयीपणे हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. केवळ वारंवार रसगुल्ला मागितल्याच्या कारणावरून आचाऱ्याने या 11 वर्षांच्या मुलाला थेट पेटत्या तंदूरमध्ये टाकले. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, गंभीररीत्या भाजलेल्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना समोर आली आहे.
केवळ एका रसगुल्ल्यासाठी इतकी क्रूरता?
मलौली गोसाई गावात एका नातेवाईकाच्या लग्नासाठी चमन नावाचा 11 वर्षांचा मुलगा आपल्या आजीसोबत आला होता. खेळता खेळता तो जेवणाच्या स्टॉलवर गेला आणि त्याने आचाऱ्याकडे रसगुल्ला मागितला. तो वारंवार रसगुल्ला मागत असल्याचा राग मनात धरून आचाऱ्याने चमनला पकडले आणि थेट धगधगत्या तंदूरवर बसवले. या घटनेत चमन तंदूरमध्ये पडल्याने त्याच्या किंकाळ्यांनी लग्नमंडप हादरून गेला. उपस्थितांनी धाव घेत त्याला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत आगीच्या ज्वाळांनी त्याच्या शरीराचा मोठा भाग पोळला होता.
हेही वाचा – Accident News: भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप; भरधाव कार चालवत 5 जणांना चिरडलं, जखमींवर उपचार सुरू
मुलाची मृत्यूशी झुंज आणि आरोपीचा पोबारा
तंदूरमधील आगीमुळे चमन चेहऱ्यापासून ते कंबरेपर्यंत गंभीररीत्या भाजला गेला आहे. त्याला तातडीने अयोध्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, परंतु प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्याला लखनऊ मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. सध्या तो आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, हे अमानवीय कृत्य केल्यानंतर आरोपी आचारी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. चमनच्या आईचे निधन झाले असल्यामुळे तो आपल्या आजीकडे राहत होता, त्याच्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडित मुलाच्या मामाने छावनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती सर्कल ऑफिसर स्वर्णिमा सिंह यांनी दिली. एका निष्पाप मुलाच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या विकृत मानसिकतेच्या आचाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. लग्नासारख्या आनंदाच्या सोहळ्यात घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.