Varanasi Crime: क्रिकेट संघात निवड करण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वाराणसी पोलिसांनी एका क्रिकेट प्रशिक्षकाला अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) गौरव कुमार यांनी सांगितले की, शनिवारी पोलिसांनी क्रिकेट प्रशिक्षक मुरारीलाल (45) याला अटक केली. त्याने 14 आणि 15 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला.
हेही वाचा – Crime News: मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलवलं अन्… भंडाऱ्यातील धक्कादायक घटना
ACP कुमार यांच्या माहितीनुसार, 14 आणि 15 वर्षांच्या दोन किशोरवयीन मुली सरावासाठी प्रशिक्षकाकडे गेल्या होत्या. प्रशिक्षकाने प्रथम एका 14 वर्षीय मुलीवर लखनऊमधील 14 वर्षांखालील संघात निवड आणि 'वैद्यकीय तपासणी' करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला. यानंतर प्रशिक्षकाने दुसऱ्या मुलीवरही सलग तीन दिवस लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे मुलींची तब्येत बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी डॉक्टरांना आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर मुलींच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
आरोपी प्रशिक्षकाला अटक
दरम्यान, ACP कुमार यांनी सांगितले की, आरोपी मुरारीलालच्या वाईट सवयींमुळे त्याच्या पत्नीने सुमारे पाच वर्षांपूर्वी त्याला घटस्फोट दिला आहे. 2021 मध्ये केंद्रीय विद्यालयात प्रवेश देण्याच्या बहाण्याने त्याने काही मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी आरोपीला यापूर्वी अटक करण्यात आली होती. मुलींच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून मुरारीलालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.