CBI Big Bust : सीबीआयची मोठी कारवाई! 4 परदेशी नागरिक ताब्यात; 1000 कोटींचा सायबर फ्रॉड उघड

तपासात शेकडो बँक खात्यांद्वारे 1 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे हस्तांतरण झाल्याचे आढळून आले आहे.
CBI Big Bust : सीबीआयची मोठी कारवाई! 4 परदेशी नागरिक ताब्यात; 1000 कोटींचा सायबर फ्रॉड उघड

CBI Big Bust : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नुकतेच एक एक हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे मोठे जाळे उघडकीस आणले आहे. या कारवाईमध्ये चार परदेशी नागरिकांसह 17 लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. फसव्या कर्जाचे अर्ज, बोगस गुंतवणूक योजना, खोट्या अर्धवेळ नोकरीच्या संधी (पार्ट टाईम जॉब ऑफर) आणि फसवणूक करणारे ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म या साधनांचा वापर करून देशभरातील हजारो लोकांची फसवणूक केली जात असल्याची बाब सीबीआयच्या तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात 58 कंपन्या देखील सहभागी होत्या. यापैकी तीन मुख्य आरोपींना ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती.

बोगस कंपन्यांचे जाळे आणि कार्यपद्धती
या संपूर्ण फसवणूक ऑपरेशनच्या केंद्रस्थानी 111 बोगस (शेल) कंपन्या होत्या. या कंपन्या खोटे संचालक, बनावट कागदपत्रे, खोटे पत्ते वापरून तयार करण्यात आल्या होत्या. या बनावट कंपन्यांच्या माध्यमातूनच बँक खाती आणि पेमेंट गेटवेचा वापर करणे शक्य झाले. तपासात असेही आढळून आले की, सायबर फसवणूक (Cyber Fraud) करणाऱ्यांनी एक अत्यंत स्तरबद्ध (Highly Layered), तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत अशी कार्यपद्धती अवलंबली होती. यात खऱ्या सूत्रधारांची ओळख लपवणे आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी त्यांनी गुगल जाहिराती, मोठ्या प्रमाणात संदेश प्रणाली (बल्क एसएमएस कॅम्पेन), क्लाउड कंट्रोलर्स आणि सिम-बॉक्स मेसेजिंग सिस्टीम, क्लाउड सर्व्हर्स, तंत्रज्ञान आधारित प्रणाली (फिनटेक प्लॅटफॉर्म ) आणि अनेक फसव्या बँक खात्यांचा (म्यूल बँक खाती) उपयोग केला होता.

मोठी आर्थिक उलाढाल आणि विदेशी नियंत्रण
तपासात शेकडो बँक खात्यांद्वारे 1 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे हस्तांतरण (Money Transfer) झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये एकाच खात्यात अत्यंत कमी कालवधीमध्ये 152 कोटींहून जास्त रक्कम जमा झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) दिलेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता. त्यांनीच ऑनलाईन गुंतवणूक आणि नोकरीशी संबंधित फसवणुकीमध्ये वाढ झाल्याचे सांगितले होते.

देशव्यापी कारवाई आणि पुरावे
सीबीआयने कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, झारखंड, हरियाणा अशा 27 ठिकाणांवर शोध घेतला आणि तेथून डिजीटल उपकरणे, कागदपत्रे आणि आर्थिक नोंदी जप्त केल्या. फॉरेन्सिक तपासणीत आढळून आले आहे की, या संपूर्ण ऑपरेशनवर परदेशी नागरिकांचे थेट परदेशातून नियंत्रण होते. सुरुवातीला तक्रारी या वेगवेगळ्या प्रकरणात येत होत्या, मात्र सखोल विश्लेषण केले असता नेटवर्क एकसारखेच मोबाईल अॅप्सचा वापर, फंड-फ्लो पॅटर्न्स, पेमेंट गेटवेज आणि डिजिटल फूटप्रिंट वापरत असल्याचे आढळून आले.

सूक्ष्म नियंत्रण आणि कारवाईचा उद्देश
दोन भारतीय आरोपींशी संबंधित एक अंकीय ओळख क्रमांक (UPI ID) ऑगस्ट 2025 पर्यंत एका परदेशातील ठिकाणाहून सक्रिय होता, ज्यामुळे प्रत्यक्ष वेळेत परदेशातून नियंत्रण (Supervision) केले जात असल्याचे उघड झाले. तपासात परदेशी सूत्रधारांची (हँडलर्सची) ओळख झोयू यी (Zou Yi), हुआन लियू (Huan Liu), वेइजियान लियू (Weijian Liu) आणि गौनहाऊ वँग (Guanhua Wang) अशी असून त्यांनी 2020 पासून भारतात बनावट कंपन्या स्थापन केल्या. दरम्यान, ही कारवाई सीबीआयच्या 'ऑपरेशन चक्र-5' चा एक भाग आहे, ज्याचा उद्देश देशातील संघटित आणि अंतरराष्ट्रीय सायबर आर्थिक गुन्ह्यांना रोखणे हा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version