प्रॉपर्टीवरून अनेक कुटुंबांमध्ये लहान सहान खटके उडत असतात, मात्र हा वाद वेळीच थांबवला नाही तर त्याचे परिणाम फार भयंकर भोगावे लागतात. अशीच एक घटना कानपूरमधून समोर आली आहे. कोट्यधीश असूनही सासरे पैशांवर बंधनं आणत असल्यामुळे आणि खासगी आयुष्यात सतत हस्तक्षेप करत असल्यामुळे सुनेनेच आपल्या सासऱ्याचा काटा काढला. नोकरांनाच 6 लाखांची सुपारी देऊन सुनेने सासऱ्याला कायमच आपल्या वाटेतून बाजूला सारलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच पोलिस देखील चक्रावले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, 63 वर्षीय प्रसिद्ध बिझनेसमॅन आणि औषध विक्रेते विनीत मिनोचा यांची त्यांच्याच फ्लॅटमध्ये कथितरित्या हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 36 वर्षीय सून शालू मिनोचा हिने शनिवारी रात्री आपल्या सासऱ्यांची हत्या केली. 5 सप्टेंबर रोजी शालू आणि तिचे पती एका पार्टीला गेले होते. त्याचवेळी, दोन माणसे डुप्लिकेट चावी वापरून विनीतच्या फ्लॅटमध्ये घुसले आणि आत लपून बसले. रात्री सुमारे 10:58 वाजता विनीत घरी परतल्यावर, आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.
पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर 26 वेळा चाकूने वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 4:30 च्या सुमारास कुटुंबीय घरी परतले आणि त्यांना विनीतचा मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी विनीत मनोचा यांची सून, नोकर आणि नोकराच्या मित्राला अटक केली. चौकशीदरम्यान, तपास अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, शालूनेच खून करण्यासाठी माणसे भाड्याने दिली होती. खुनामागे पैसा, मालमत्ता आणि निर्बंध असल्याचा आरोप आहे.
याप्रकरणात एक धक्कादायक खुलासा उघड झाला आहे. शालूविरुद्ध पोलिसांना भक्कम पुरावा मिळाला आहे. यावेळी शालूने नोकरासोबत 1 मे ते घटनेच्या दिवसापर्यंत 309 वेळा संवाद साधला होता त्याची कॉल हिस्ट्री पोलिसांच्या हाती लागली आहे. इतकचं नव्हेतर 49 डिलीट केलेले चॅट मेसेजेस देखील सापडले आहेत. पोलीस आता तांत्रिक आणि डिजिटल फॉरेन्सिक पद्धतींचा वापर करून हे डिलीट केलेले मेसेजेस परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. लीस आता कॉल डिटेल्स आणि चॅट पॅटर्नचीही तपासणी करत आहेत.