8th Pay Commission Scam: देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) मोठी उत्सुकता आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार किती वाढणार, याची गणिते प्रत्येक कर्मचारी मांडत आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या याच कुतूहलाचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा सापळा रचला आहे. गृह मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा उपक्रम ‘सायबर दोस्त’ ने या संदर्भात धोक्याचा इशारा जारी केला असून, कोणत्याही अनोळखी लिंक किंवा फाईल्सवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे.
पगार कॅल्क्युलेटरच्या नावाखाली ‘APK’ फाईलचा धोका
अलिकडच्या काळात व्हॉट्सॲपवर ‘पगार कॅल्क्युलेटर’ (Salary Calculator) या नावाने मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या मेसेजमध्ये असा दावा केला जातो की, सोबत दिलेली फाईल डाऊनलोड करून कर्मचारी त्यांच्या होणाऱ्या पगारवाढीचा अचूक अंदाज घेऊ शकतात. या मेसेजसोबत एक .APK फाईल जोडलेली असते. ही फाईल म्हणजे प्रत्यक्षात एक मालवेअर (Malware) असून, कर्मचाऱ्यांना विश्वास वाटावा यासाठी तिला अधिकृत नाव दिले जाते. मात्र, ही फाईल इन्स्टॉल करणे म्हणजे स्वतःच्या हाताने बँक खात्याची चावी हॅकर्सना देण्यासारखे आहे.
तुमचा फोन आणि बँक खाते कसे होते हॅक?
जेव्हा एखादी व्यक्ती ही बनावट .APK फाईल फोनवर डाऊनलोड करून इन्स्टॉल करते, तेव्हा फसवणूक करणारे गुन्हेगार त्या मोबाईलवर पूर्ण नियंत्रण मिळवतात. हे धोकादायक ॲप फोनमधील वैयक्तिक माहिती, कॉन्टॅक्ट्स, बँक तपशील आणि अगदी महत्त्वाचा OTP देखील चोरू शकते. एकदा का हॅकर्सना ओटीसी (OTP) ॲक्सेस मिळाला की, ते काही क्षणांत तुमच्या बँक खात्यातील कष्टाची कमाई लंपास करू शकतात.
सरकार व्हॉट्सॲपवर कधीही ॲप्स पाठवत नाही
सरकारी यंत्रणांनी आणि सायबर तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, शासन कधीही पगार किंवा वेतन आयोगाशी संबंधित कोणतीही माहिती किंवा सॉफ्टवेअर व्हॉट्सॲपसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून पाठवत नाही. अधिकृत माहितीसाठी कर्मचाऱ्यांनी केवळ सरकारी संकेतस्थळांवरच (उदा. https://8cpc.gov.in/) अवलंबून राहणे आवश्यक आहे. अज्ञात स्त्रोतांकडून आलेले कोणतेही ॲप डाऊनलोड करणे आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत घातक ठरू शकते.
सरकारी कर्मचारियों को WhatsApp पर message भेजकर कहा जा रहा है कि 8वें वेतन आयोग लागू होने पर उनकी salary कितनी होगी, यह जानने के लिए एक APK file download करें जैसे ही APK install की जाती है, mobile ka access fraudsters ke paas chala jaata hai#APKScamAlert #PayCommissionScam pic.twitter.com/UO6hSMkMmj — CyberDost I4C (@Cyberdost) February 13, 2026
असा मेसेज आल्यास काय करावे?
जर तुमच्या व्हॉट्सॲपवर पगार वाढीचा अंदाज घेणारा किंवा आठव्या वेतन आयोगाशी संबंधित कोणताही संशयास्पद मेसेज आला, तर तो त्वरित डिलीट करा. असा मेसेज चुकूनही दुसऱ्याला फॉरवर्ड करू नका. आपल्या सहकाऱ्यांना आणि ओळखीच्या लोकांना या नवीन सायबर घोटाळ्याबद्दल माहिती देऊन त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मदत करा. लक्षात ठेवा, तुमची सतर्कता हाच या सायबर फसवणुकीपासून वाचण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.