‘डॉक्टर पतीनं भयंकर कट रचून केली हत्या;’ मुलीच्या आठवणींच्या असह्य दु:खामुळं वडिलांनी तिच्यासाठी बांधलेल्या घराबाबत घेतला ‘असा’ निर्णय

या वर्षी एप्रिल महिन्यात डॉ. कृतिकाच्या पतीने तिच्यावर उपचार केल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या सहा महिन्यांनंतर तिची बहीण निकीता हिच्या प्रयत्नांमुळे मृत्यूचे नेमके कारण समोर आले.
‘डॉक्टर पतीनं भयंकर कट रचून केली हत्या;’ मुलीच्या आठवणींच्या असह्य दु:खामुळं वडिलांनी तिच्यासाठी बांधलेल्या घराबाबत घेतला ‘असा’ निर्णय

बंगळुरू : शहरात एका डॉक्टर पतीने आपल्या डॉक्टर पत्नीला थंड डोक्याने संपवल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. रुग्णालयाच्या बांधकामासाठी सासऱ्यांकडून आर्थिक मदत मिळाली नाही, या कारणामुळे डॉ. महेंद्र रेड्डी याने त्याची पत्नी डॉ. कृतिका रेड्डीला भूल देण्याचे इंजेक्शन देऊन ठार मारले. पत्नीच्या मृत्यूला जवळपास सहा महिने झाल्यानंतर या गुन्ह्याचा छडा लागला.

डॉ. कृतिका रेड्डीच्या वडिलांनी अत्यंत दुःखाने घेतलेला एक निर्णय आता समोर आला आहे. त्यांनी आपल्या मुलीसाठी लग्नानंतर बांधलेले तीन कोटी रुपये किमतीचे घर इस्कॉनला दान केले आहे. बंगळुरूच्या मुन्नेकोलाल परिसरातील अय्यप्पा लेआऊटमध्ये असलेल्या या घराबाहेर आता 'In Memory of Dr. Krithika M. Reddy' असा फलक लावण्यात आला आहे. 1500 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या या बंगल्याची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत 3 कोटी रुपये आहे.

त्वचारोगतज्ज्ञ (Dermatologist) असलेल्या डॉ. कृतिका यांचा विवाह मे 2024 मध्ये डॉ. महेंद्र रेड्डी यांच्याशी झाला होता आणि त्यानंतर ते याच घरात राहण्यासाठी आले होते. या वर्षी एप्रिल महिन्यात तिच्या पतीने तिच्यावर उपचार केल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. कृतिकाचे वडील मुनी रेड्डी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "माझी मुलगी तिचा पती आणि मुलांसह आनंदात राहावी म्हणून मी हे घर बांधले होते, पण आता तीच या जगात उरली नाही. त्यामुळे हे घर मी इस्कॉनला देऊन टाकले."

मृत्यूचे कारण सहा महिन्यांनंतर उघड
डॉ. कृतिकाच्या मृत्यूच्या सहा महिन्यांनंतर तिची बहीण निकीता हिच्या प्रयत्नांमुळे मृत्यूचे नेमके कारण समोर आले. फॉरेन्सिक अहवालात कृतिकाला प्रोपोफोल (Propofol) नावाच्या औषधाची जादा मात्रा (Overdose) देण्यात आल्याचे आढळून आले. हे औषध रुग्णालयात शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यासाठी वापरले जाते. डॉ. महेंद्र रेड्डी हा सर्जन असल्यामुळे, त्याच्यावर सर्वात प्रथम संशयाची सुई गेली आणि अखेर त्याला या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – Bengaluru Crime: अभियांत्रिकी महाविद्यालयातील 21 वर्षीय विद्यार्थी मुलीला वॉशरुममध्ये घेऊन गेला अन्…, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वडील मुनी रेड्डी यांची वेदना
मुनी रेड्डी यांनी सांगितले की, मी माझ्या दोन्ही मुलींसाठी दोन घरे बांधली होती. जेणेकरून लग्नानंतर त्या त्यांच्या कुटुंबासोबत सुखात राहतील. पण कृतिकाच्या मृत्यूनंतर आता मला त्या घरात जाण्याची हिंमत होत नाही. ते म्हणाले, "तिच्या आठवणी माझा पाठलाग करतात. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी हे घर मी इस्कॉनला दिले. इस्कॉनकडून इथे आध्यात्मिक कार्यक्रम घेतले जातात. माझी मुलगी मृत्यूनंतरही या कार्यक्रमाचा भाग होईल, असे मला वाटते." मुनी रेड्डी पुढे म्हणाले, "कृतिकाच्या मृत्यूनंतरही ती याच घरात राहते, असे मला सतत वाटते. तिच्या बालपणीच्या आठवणी आठवून मला उचंबळून येते."

'त्याने माझ्या मुलीला खून करण्याऐवजी घटस्फोट द्यायला हवा होता'
मुनी रेड्डी यांनी संताप व्यक्त केला की, "आम्ही लग्नापूर्वी महेंद्र रेड्डीची पार्श्वभूमी तपासली होती. कृतिका आणि महेंद्र यांच्यात लग्नानंतर थोड्याबहुत अडचणी होत्या, पण प्रत्येक जोडप्यात काही ना काही अडचणी येतातच. कृतिका एक चांगली विद्यार्थिनी आणि प्रोफेशनल डॉक्टर होती. जर महेंद्रला काही अडचण होती, तर त्याने तिचा खून करण्याऐवजी घटस्फोट घेऊन बाजूला व्हायला हवे होते."

21 एप्रिल 2025 रोजी नेमकं काय घडलं?
मुनी रेड्डी यांनी 21 एप्रिल 2025 च्या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले, "कृतिकाला गॅसेसचा त्रास होत आहे, असे सांगून महेंद्रने तिला इंजेक्शन दिले. त्यानंतर तो तिला रुग्णालयात घेऊन गेला. पण त्याने तिला सीपीआर दिला नाही आणि तिला मृत घोषित करण्यात आले." दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात सांगितले की, डॉ. महेंद्र हा सगळा प्रकार नैसर्गिक मृत्यूचा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर महेंद्रचा बनाव उघडा पडला आणि त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा – Sabarimala Gold Theft Case: केरळ SIT ची मोठी कारवाई! शबरीमला सोने चोरी प्रकरणात मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी अटकेत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version